ssc exam : मुले कमी जन्माला घातल्याने परीक्षार्थी घटले, बोर्डाच्या अध्यक्षांचा अजब दावा
बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
पुणे : राज्यात बारावीच्या परीक्षा (HSC EXAM) सुरू असताना इयत्ता दहावी परीक्षेसदेखील (SSC Board Exam) 2 मार्चपासून सुरुवात होत आहे. परंतु यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. विद्यार्थी संख्येत घट झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे. पालक कमी पाल्य जन्माला घालत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे, असे त्यांनी म्हटलंय. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 61 हजार विद्यार्थी कमी झाल्याची माहिती बोर्डाने दिलीय.
२५ मार्चपर्यंत परीक्षा
राज्यात १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी दहावीची परीक्षा यंदा परीक्षा देणार आहे. त्यासाठी मंडळाकडून सर्व तयारी पूर्ण झालीय. ही परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार असून २५ पर्यंत चालणार आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यंदा ५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षा देत असून त्यातील ८ लाख ४४ हजार ११६ मुलं तर ७ लाख ३३ हजार ६७ मुली आहेत. राज्यातील २३ हजार माध्यमिक शाळांमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिका केंद्र संचालक यांच्याकडे पाठवताना जी पी एस चा वापर तसेच चित्रीकरण होणार आहे.
यंदा विद्यार्थ्यांची संख्या घटली
दहावीच्या परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यासंदर्भात बोलताना मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, इतर बोर्डाच्या शाळेची संख्या वाढली आहे. तसेच पालक कमी मुले जन्माला घालत आहे, यामुळे मुलांची संख्या घटल्याचा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केला. त्यांच्या या दाव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या सूचना पाळाव्यात
विद्यार्थ्यांसाठी मंडळाने काही सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात अर्धातास आधी सेंटरवर पोहचणे अनिवार्य
- सोशल मीडियावर होणाऱ्या व्हायरल प्रश्नपत्रिका तसेच व्हायरल होणाऱ्या सूचना यांना बळी पडू नये
- विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटचे १० मिनिटे वाढवून दिली आहे.
बारावीच्या पेपरसंदर्भात दिलगिरी
बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आली आहे. परंतु या चुकीबद्दल मंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
गेल्या पाच वर्षात विद्यार्थ्यांची संख्या
मार्च १९ : १६ लाख ९९ हजार ४६५
मार्च २० : १७ लाख ६५ हजार ८२९
मार्च २१ : १६ लाख ५८ हजार ६१४
मार्च २२ : १६ लाख ३८ हजार ९६४
मार्च २३ : १५ लाख ७७ हजार २५५