कोल्हापूर, नगरमध्ये हिंसा, शरद पवार यांचं नागरिकांना आवाहन काय?; सरकारवरही टीका

| Updated on: Jun 08, 2023 | 12:35 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर आणि नगरच्या हिंसाचारावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोल्हापूर, नगरमध्ये हिंसा, शरद पवार यांचं नागरिकांना आवाहन काय?; सरकारवरही टीका
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामती : कोल्हापूर आणि नगरमध्ये हिंसा झाली. औरंगजेबाचा फोटो आणि स्टेट्सवरील मेसेजवरून हा राडा झाला आहे. त्यामुळे दोन्ही शहरात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच या दोन्ही जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासनाला सहकार्य करा, कायदा आणि सुव्यवस्था राखा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

कोल्हापूर आणि नगरमधील घटना लौकीकाला शोभणाऱ्या नाहीत. कोल्हापूरचा इतिहास समाज परिवर्तनाचा इतिहास आहे. सर्व सामान्य लोकांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य दिलं पाहिजे. सर्वांनी मनापासून सहकार्य केलं तर ही अवस्था बंद होईल. कोल्हापूर असो की इतर या सर्व शहरांची सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे तिथे शांतताच प्रस्थापित केली पाहिजे. शाहू महाराजांचा आदर्श ठेवून सामान्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. चार दोन लोक चुकीचं वागत असेल तर बहुतेकांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. सर्वांनी शांततेचं सहाकार्य करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

राज्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हा वाद होऊ देऊ नका. सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करायला हवी, शांतता राखा असं शरद पवारांनी जनतेला आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जनतेनं शासकीय यंत्रणेचा मदत करावी असंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

दरम्यान, दुधाच्या दराबाबत मी राज्य सरकारशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यातून मार्ग काढण्याची विनंती करणार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आज शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा महत्त्वाचा झालाय. जिथं जिरायत शेती आहे तिथे दूध व्यवसाय संबंधित शेतकऱ्यांचा प्रपंच चालवतो. त्यामुळे दूधाचे दर घसरणे या सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे मी पुढील काही दिवसात राज्य सरकारशी विचारविनीमय करणार आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती करणार असून मुख्यमंत्र्यांची या प्रश्नासंदर्भात भेट घेणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

निर्णय मान्य करू

नगरच्या नामांतरावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नामांतराचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात वाद व्हायला नको. आता शासनाने निर्णय जाहीर केलाय. तो कसा केला, कशा पद्धतीने केला याची चर्चा होवू शकते. मात्र एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यात वाद व्हायला नको ही भूमिका घेवू आणि जो निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी करू, असं त्यांनी सांगितलं.