पुणे : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे उद्विग्न होत एक मागणी केली आहे. दुधाला भावच नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत प्रचंड नाराज झाले आहेत. देशी दारूच्या एका बाटलीची जेवढी किंमत आहे, तेवढे पैसे आम्हाला नकोत. पण देशी दारूच्या एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढी किंमत एक लिटर दुधाला द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी ही उद्विग्न मागणी करत राज्य सरकारला इशाराही दिला आहे. 22 मे रोजी पुण्यामध्ये दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. त्याची दखल घेऊन दुग्धविकास मंत्रालयाने बैठक लावली आहे. या बैठकीत आम्ही दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणं अवघड नाही. त्यामुळे महागाई वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित मनाने कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. त्या शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये, असा इशाराच खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.
जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू आणि त्यानंतर स्वतःचा भगवा फडकवू, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर खोत यांनी प्रतिक्रिया दिली. दादा कोंडकेंचं एक नाटक होतं इच्छा माझी पुरी करा. दादा कोंडके यांचा टू पार्ट म्हणजे संजय राऊत आहेत. त्यामुळेच ते इच्छा माझी पुरी करा म्हणत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागं करू. कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे असलेल्या साखर कारखानदारांने ते पैसे दिले नाहीत. पैसे देणे गरजेचे आहे. पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांकडे अनेक समस्या आहेत. जर 30 जूनपर्यंत पैसे दिले नाहीत तर 1 जुलै रोजी साखर कारखांन्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असंही ते म्हणाले.