रणजित जाधव, आळंदी, पुणे : आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केली होती. मनसेनेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले आहे. हा प्रकार कसा घडला अन् कसा टाळता आला असता, हे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्तावनावेळी घडलेल्या परिस्थितीवर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने खुलासा करण्यात आलाय. त्या खुलासानुसार २०१७-१८ पासूनच मंदिरात प्रस्थानाला होणाऱ्या गर्दी बाबत चर्चा सुरू होती. त्या संबंधी मान्यताप्राप्त वास्तू विशारद संस्थेकडून अभ्यास करून मंदिरातील प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे ४५०० हजार लोक सुरक्षित वावरू आणि खेळू शकतील, हे समोर आले. त्यानुसार ४७ दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालखी प्रस्थनाला सुरुवात होत असताना जोग वारकरी शिक्षण संस्थेतील ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आले. या विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यातील ३५ जणांना प्रवेश देण्याचे मान्य केले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची कारवाई झाली. विद्यार्थी सामंज्यस्याने वागले असते तर हे घडले नसते असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलंय.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला होता. गेल्या वर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या. या वेळी हे प्रकार टाळण्यासाठी मंदिर समितीने बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक मानाच्या दिंडीला ७५ पासेस देण्याचा निर्णय घेतला होता. पण काही वारकरी, तरुणांनी पासेस नसताना आत जाण्याचा आग्रह धरला. काही जणांनी बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी थोडी झटापट झाली अन् या झटपटीत काही पोलिसही देखील जखमी झाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.