पुणे : घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती…या कवितेप्रमाणे एक घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक सामान्यांचे असते. वाढत्या शहरीकरणानंतर शहरांमध्ये घर घेण्याचे प्रमाण वाढत आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये घरांना मोठी मागणी आहे. एकीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदारात कपात केली जात नाही, त्यानंतर घरांची मागणी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत घरांना कुठे अन् किती मागणी आली, ही माहिती समोर आली आहे. या तीन महिन्यांत देशात 80 हजार 250 घरांची विक्री झाली आहे. त्यात सर्वाधिक विक्री पुणे शहरात झाली आहे.
भारतात एप्रिल ते जून या तीन महिन्यात घरांची विक्री मागील वर्षापेक्षा वाढली आहे. 2022 मधील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत 74 हजार 320 घरांची विक्री झाली होती. 2023 मध्ये 80 हजार 250 घरांची विक्री झाली आहे. देशातील आठ मेट्रो शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे तर काही शहरांमध्ये कमी झाली आहे. त्यात सर्वाधिक विक्री पुणे शहरात झाली आहे. ब्रोकरेज फर्म प्रॉपटायगरने यासंदर्भात एक माहिती जारी केली आहे.
2023 मधील पहिले तीन महिने मुंबई, पुणे अन् अहमदाबादमध्ये घरांची विक्री वाढली आहे. त्याचवेळी दिल्ली- NCR, बेंगळुरु, हैदराबाद, चेन्नई अन् कोलकातामध्ये घरांची विक्री कमी झाली आहे. REA इंडिया ग्रुपचे CFO विकास वधावन यांनी म्हटले की, देशात आठ मेट्रो शहरांमध्ये निवासी प्रकल्प योजनांमध्ये चांगली वाढ होत आहे. आरबीआयकडून गृहकर्जाचे व्याजदर कमी केले जात नसतानाही घरांची विक्री वाढत आहे. अहमदाबादमध्ये 17 टक्के घरांची विक्री वाढली आहे. पुणे शहरात सर्वाधिक 37 टक्के वाढ झाली आहे.
एप्रिल ते जून या महिन्यात अहमदाबादमध्ये 2022 मध्ये 7 हजार 240 घरांची विक्री झाली होती. 2023 मध्ये त्यात 8 हजार 450 घरांची विक्री झाली आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात मागील वर्षी 26 हजार 160 घरांची विक्री झाली होती आता ती 26 हजार 160 झाली आहे. पुणे शहरातील घर विक्रीची टक्केवारी चांगलीच वाढली आहे. पुण्यात मागील वर्षी 13 हजार 720 घरे विक्री झाली होती, यंदा ती संख्या 37 टक्क्याने वाढून 18 हजार 850 झाली आहे.
पुणे शहरात घर घेणाऱ्यांचा कल दिवसंदिवस वाढत आहे. पुणे शहरातील वातावरण चांगले आहे. रोजगाराच्या अनेक संधी पुणे शहरात उपलब्ध आहे. तसेच शिक्षणाचे हब म्हणून पुणे शहराची ओळख आहे. यामुळे पुणे शहरात घर घेण्याचा कल वाढत जात आहे.