राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : भारत राष्ट्र समितीने नांदेडमधून महाराष्ट्रात एंट्री केली. काही माजी आमदार भारत राष्ट्र समितीच्या गळाला लागले. त्यांनी येणाऱ्या विधानसभेची तयारी आतापासून सुरू केली. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी काय -काय केले. याची जाहिरातबाजी महाराष्ट्रात सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी पत्रक वाटून भारत राष्ट्र समितीने आपले व्हिजन डॉक्युमेंट आतापासून शेतकऱ्यांना सांगणे सुरू केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे भारत राष्ट्र समितीचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी काल समर्थकांचा मेळावा घेतलाय. रस-पुरणपोळीच्या मेजवाणीच्या या कार्यक्रमाला समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. याच कार्यक्रमात समर्थकांनी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना विधानसभेची निवडणूक लढवण्याची मागणी केली.
कार्यकर्त्यांच्या मागणीला होकार देणार नाही ते शंकरअण्णा कसले? धोंडगे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. लोहा कंधारमध्ये आधीच आमदार श्यामसुंदर शिंदे आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दाजी भावजित कलगीतुरा रंगलेला आहे.
आता शंकरअण्णा धोंडगे यांच्या घोषणेनंतर चुरस आणखीन वाढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधारच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडीला वेग येईल, असे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धोंडगे रस आणि पुरणपोळीची मेजवाणी देत आहेत. तसेच याच कार्यक्रमात आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करत असतात.
मी हे सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीसाठी करत आहे, असं सांगायला शंकरअण्णा विसरले नाही. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. भारत राष्ट्र समिती आतापासून विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे प्रस्तापितांना सावध होणे गरजेचे आहे.