संतोष जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने तुळजापूर ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा गुंजणार आहे. मात्र, यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही, असा इशाराच मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठि मराठा समाज आक्रमक झाला आहे. पंढरपुरात केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकार कमी पडल्यानेच ही याचिका फेटाळण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. सरकारच्या या बेपर्वाईचाच निषेध म्हणून मराठा आंदोलकांनी सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवला आहे.
यावेळी मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले होते. पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने हे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे. लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर आषाढी यात्रेची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांना करू देणार नाही, असा इशाराच मराठा आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, याच आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने तुळजापूर ते मुंबईपर्यंत मराठा वनवास यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तुळजापूर ते मुंबईपर्यंत पुन्हा एकदा एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा ऐकायला मिळणार आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मराठा समाज तुळजापुरातून आरक्षणाच्या मागणीचा एल्गार पुकारणार आहे.
एक महिनाभर मराठा समाजाचे कार्यकर्ते तुळजापूर ते मुंबई मंत्रालय पायी वनवास यात्रा काढणार आहेत. 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनाचं निमित्त सादर यात्रेचा समारोप केला जाणार आहे. मुंबईमध्येच आझाद मैदानावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार असल्याची भूमिका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.