परभणी : परभणीत अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. या मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला की गाळात अडकून मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, पाचही मजदूर एकाचवेळी दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री हा दुर्देवी प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
सेप्टिक टँकचे सफाईचे काम करत असताना झालेल्या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. मारुती राठोड यांच्या शेत शिवारात आखाड्यावर सेप्टिक टँकचे सफाईचे काम करत असताना रात्री हा प्रकार घडला. हे कामगार सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरले ते परत आलेच नाहीत. आले ते त्यांचे मृतदेह. रात्रीचा अंधार असल्याने हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. शेख सादेक 45, शेख शाहरुख 20, शेख जुनेद 29, शेख नविद 25 आणि शेख फिरोज 25 अशी या दुर्देवी घटनेतील मृतांची नावे आहेत. तर शेख साबेर हा जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाचही मृतदेह सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी व्यक्तीकडूनच हा प्रकार कसा घडला याची माहिती मिळणार असल्याने पोलीस त्याची चौकशी करणार आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील भोकर रोडवर एका ट्रकने बुलेटला धडक दिल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. खैरगांव – आमराबाद फाट्याजवळ हा अपघात झाला. खरबी गावातील लग्न समारंभ उरकून संदीप आणि राहुल काळे हे चुलत भाऊ नांदेडकडे परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला. यातील दोन्ही मयत हे नांदेड शहरातील चौफाळा भागातील रहिवासी होते.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील सवकी फाट्यावर हा विचित्र अपघात झाला असून बसने ट्रॅकरला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅकर पिकअपवर जोरदार आदळला. त्यामुळे मोठा अपघात झाला. रात्री उशिरा हा अपघात झाला असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. काही गंभीर तर 15 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असून जखमींना सटाणा शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.