नीलेश डहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावालगत वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत उत्खननासाठी ब्लास्टिंग केली जाते. ब्लास्टिंगनंतर मोठमोठे दगड परिसरातील शेतांमध्ये जाऊन पडतात. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत.
स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजूबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या उन्हाळी हंगामाची कामे शेतामध्ये सुरू आहे. मजुरासह स्वत: शेतमालकदेखील त्यासाठी शेतात राबत आहे. त्यातच आता लगतच्या नागलोन खुल्या कोळसा खाणीत ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे शेतात येऊन पडणाऱ्या दगडांमुळे शेतकरी, शेतमजुर भयभीत झाले आहेत.
खाणीला लागूनच माजरी, कुचना, पाटाळा, नागलोन, पळसगाव या गावाचे लोकवस्तीदेखील आहे. ताज्या स्फोटातील दगड कोराडी नाल्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ९३० ला ओलांडून शेतात येऊन पडले. त्यामुळे त्यांच्या शेतात एक फूट खोल दगडांचा खच पडला. याचवेळी शेतमालक शेतातच उपस्थित होते.
स्फोटानंतर दगड येऊन शेतमालक अरुण महातडे यांच्या अगदी जवळ पडताच त्यांनी जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला. या घटनेत सुदैवाने शेतमालक बाल-बाल बचावले. ब्लास्टिंगच्या संदर्भात परिसरातील लोकप्रतिनिधी आणि पीडित गावकऱ्यांनी वेकोलिला वारंवार लेखी आणि तोंडी सूचना दिल्या. पण, वेकोलिकडून मुजोरपणे दिवसाढवळ्या उच्च तीव्रतेचे स्फोट घडविले जात असल्याचा आरोप आहे.
नियमानुसार सुरक्षेची काळजी घेऊन स्फोट घडविणे आवश्यक आहे. अशी कोणतीही काळजी घेतली जात नाही. वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. संबंधित वेकोलिच्या अधिकाऱ्यांविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली आहे. नागलोनचे सरपंच रवी ढवस आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर यांनी याबाबत तक्रार केली आहे.