मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्टीचं आमंत्रण नाही, मानेवर तलवार धरली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही- बच्चू कडू
Bacchu Kadu on CM Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्टीचं आमंत्रण; मंत्रिपद नको हवं तर 'या' आमदाराला मी मंत्री करेन... काय म्हणाले बच्चू कडू? वाचा...
नागपूर | 17 ऑगस्ट 2023 : शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी डिनरसाठी आमंत्रित केलं आहे. मात्र या त प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना माहिती दिली आहे. मला या डिनरबद्दल माहिती नाही. पण तिथे फक्त मंत्र्यांनाच बोलावलं आहे, असं वाटतं. मला तरी या स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसंच मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रहारची भूमिका यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिपदाच्या दर्जाचं पद माझ्याकडं आहे. पण ते मंत्रिपद नाही. त्यामुळे मला बोलावलं नसावं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण कठोर भूमिका घेतलीत. त्यामुळे आपल्याला बोलावलं नसावं, असं वाटतं का असं विचारण्यात आलं. तेव्हा एवढ्या हलक्या कानाचे लोक सध्या सरकारमध्ये नाहीत. त्यामुळे तसा काही विषय असावा असं नाही, असं बच्चू कडू म्हणालेत.
मंत्रिपदाबाबतही त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही. तशी परिस्थिती आल्यास राजकुमार पटेल यांना आम्ही मंत्री करू, असं बच्चू कडू म्हणालेत.
आजपासून दिव्यांगाच्या दारी अभियान सुरु होणार आहे.संपूर्ण राज्यात फिरुन दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही दिव्यांगासाठी एक धोरण आखणार आहोत. 16 ॲाक्टोबरपर्यंत राज्यात फिरुन डिसेंबरपर्यंत धोरण तयार करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणालेत.
पवार काका – पुतण्यावरून संभ्रम व्हायचं कारण नाही. प्रत्येक नेता पक्ष आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता आणि सत्तेतला पक्ष असं समिकरण सध्या झालंय. शरद पवार यांच्या स्वभावाची मोजणी करणं शक्य नाही. समुद्राचा तळ मोजला जाईल, पण शरद पवार यांच्या मनात काय चाललं हे ओळखणं शक्य नाही, असं म्हणत शरद पवार यांच्या भूमिकेवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपने पावलं टाकली असतील. राष्ट्रवादीचाच गेम करायचा आणि पवार साहेब भाजपचाच गेम करतील की काय, अशा संभ्रमात सध्या अवस्था आहे. अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा शिंदे साहेबांना डावलून अजितदादां मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील,असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.