अकोला : उत्तर भारतात पाऊस अक्षरश: धुमाकूळ माजवतोय. हिमाचल प्रदेशमधील महापुराचे दृश्य अंगावर काटे आणणारे आहेत. अनेक घरं या महापुराने उद्ध्वस्त केले आहेत. शेकडो चारचाकी गाड्या पुरात वाहून गेल्या आहेत. महापुराचे अतिशय थरारक असे दृश्य समोर येत आहेत. विशेष म्हणजे विदर्भातही आज एक अनपेक्षित घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकखाली असणारी वाळूच वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रखडल्या आहेत. संबंधित मार्गाने जाणारी रेल्वे सेवाच या घटनेमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. याशिवाय या घटनेमुळे प्रशासनापुढीलही आव्हान वाढलं आहे.
नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालील वाळू वाहून गेली आहे. त्यामुळे नागपूर आणि मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्यातील या घटनेमुळे 12 रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि मानकूर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळाखालची वाळू वाहून गेली. खरंतर संबंधित परिसरात सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. त्यानंतर संबंधित घटना घडली. या पावसाचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरही गेल्या चार तासांपासूनची गाडी थांबली आहे. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. प्रवाशांना होणारा मनस्ताप लक्षात ठेवून प्रशासन काम करत आहे.