देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ एका सवालाने प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची कोंडी?; थेट वर्मावरच घाव
विरोधकांची पाटणा येथे बैठक होणार आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. विरोधक पाटण्यात एकत्र येणार आहेत. 2019मध्येही विरोधक एकत्र आले होते. मंचावर 52 नेते होते. आता हातवर करणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरेही असणार आहेत.
अकोला : बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर कसे जातात? आम्ही त्यांच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहतो. त्यांच्या आजोबांनी म्हणजे बाबासाहेबांनी निजामाला सडेतोड उत्तर दिलं होतं. पण बाळासाहेब आंबेडकर आता तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जात कुणाचं महिमामंडन करतायेत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना करतानाच उद्धवजी तुमची अन् बाळासाहेबांची मैत्री आहे. त्यांनी आता औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवलीत. हे तुम्हाला चालणार का?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाही केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना सवाल करून त्यांची चांगलीच कोंडी केली आहे.
मला बाळासाहेब आंबेडकर यांना विचारायचं आहे, बाळासाहेब तुमचे आमचे विचार वेगळे असतील. पण तुमच्याकडे पाहत असताना आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. धर्मांतराची घोषमा केल्यानंतर बाबासाहेबांना त्यावेळी हैदराबादच्या निजामाने त्यावेळी मोठ्या प्रमाणात अमिषे दिली होती. त्यांना बौद्ध धर्म स्वीकारू नका म्हणून सांगितलं होतं.
पण भारताच्या भूमीत तयार झालेला धर्मच स्वीकारणार असल्याचं बाबासाहेबांनी निजामाला ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. पण औरंगजेब नेता कसा होऊ शकतो? तो आमचा राजा कसा होऊ शकतो? आमचा राजा तर एकच आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरेंना समज थोडी
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मागचं सरकार हे घरी बसणारं सरकार होतं. हे मी म्हणत नाही. मी म्हटलं तर ते राजकीय विधान होईल. पण शरद पवार यांनीच त्यांच्या आत्मचरित्रात तसं लिहिलं आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फक्त दोनच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आमचं नुकसान झालं. हेच विधान मी केलं असतं तर माझ्यावर टीका झाली असती. आमच्या विरोधात बोलतात असं म्हणाले असते. पण शरद पवार यांनीच ते म्हटलंय. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर उद्धव ठाकरे यांची राजकीय समज थोडी कमी असल्यानेच 40 आमदार त्यांना सोडून गेले. तरी त्यांना समजलं नाही. असं शरद पवार यांनीच म्हटलं आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांचं दुकान बंद
उद्धवजी तुम्हाला कुठे कुठे आग होतेय तुम्हाला सांगता येत नाही. 2019 साली उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खूपसून गेलात. महाराष्ट्रात मेरा किनारे पर घर मत बसा लेना समुद्र हूँ लोट कर फिर आऊंगा. मी एकनाथ शिंदेना सोबत घेवून आलेलो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालंय. बावनकुळेजी तुमच्या कामाची दहशत उद्धव ठाकरेच्या मनात बसली आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण लिहिणारे स्क्रिप्ट रायटरही शिंदे गटात गेले आहेत, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.