नागपूर | 24 ऑगस्ट 2023 : घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाहीत. घरात बसूनच पक्ष गेला. उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्यांचा दरारा आणि त्यांचे काम याचे आम्ही 30 वर्षाचे साक्षी आहोत. इतके लोक सोडून गेले. त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाहीत. तशी क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाही. पक्ष चालविण्यासाठी 24 तासातले 18 तास काम करावं लागतं. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार पाचच लोक दिसतील, असा दावाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मन परिवर्तन होणार असल्याचं स्पष्ट केलं. मला अजूनही वाटतं शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. मोदींच्या नेतृत्वातील इस्रोच्या टीमने चंद्रयान तीन यशस्वी केलं. त्याचप्रमाणे एक ना एक दिवस शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. काळ काही गोष्टींचा निर्णय करत असतो. आम्हाला कधी एकनाथ शिंदे, अजित पवार आमच्या सोबत असतील असं वाटलं नव्हतं. काही काळानंतर माणसाचं मनपरिवर्तन होत असतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
जे कार्यकर्ते शरद पवारांचा फोटो लावतात शरद पवारांवर निष्ठा ठेवतात त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेणं शरद पवार यांनी थांबवलं पाहिजे. शरद पवार मोठ्या विचारांचे नेते आहेत. राष्ट्रीय हेतून अजितदादा यांनी भाजपला समर्थन दिलं आहे. त्यांच्यासोबत जे आमदार आले ते शरद पवारांच्या विरोधात नाही, असं सांगतात. आज इतकं होऊनही हे नेते शरद पवारांचा फोटो लावतात. भेटायला जातात. त्यामुळे असं करून शरद पवारांनी आपली उंची कमी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
काल जयंत पाटील यांनी देखील अजित पवार आणि मी शरद पवारांचाच कार्यकर्ता असल्याचा उल्लेख केला. शरद पवार यांनी अनेक वेळा मोदींच्या व्यासपीठावर उपस्थिती लावलेली आहे. 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरिता शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा केंद्र सरकारला होईल, असा दावाही त्यांनी केला.
शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे हे सांगण्याची गरज नाही. याची गाथा आहे. ओबीसींना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच न्याय मिळाला. केंद्राची विश्वकर्मा योजना येत आहे. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींकरिता ही योजना आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते. राज्यात सरकारमध्ये होते. तेव्हा त्यांनी ओबीसी मंत्रालय का सूचविले नाही? असा सवाल त्यांनी केला.