अमरावती | 9 ऑगस्ट 2023 : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपल्याच सरकार विरोधात दंड थोपाटले आहेत. बच्चू कडू यांनी आज अमरावतीत जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चात एकूण 10 मागण्या करण्यात येणार आहे. अमरावतीनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे मोर्चे काढण्यात येणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला घेरण्याची फुल्ल तयारी केल्याचं बोललं जात आहे.
आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. जन एल्गार मोर्चाची हाक बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चात एकूण 10 मागण्या मांडण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. अमरावतीतील संत गाडगेबाब यांच्या समाधीपासून मोर्चाची सुरूवात होणार आहे. या मोर्चात 10 ते 15 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमचा हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आहे. हा मोर्चा अमरावतीत असला तरीही अमरावतीतून सुरुवात होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रहार संघटना मोर्चा काढून आपला निषेध नोंदवणार आहे. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजे. बळीराजाला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
शेतीची पेरणी ते कापणीपर्यंतची कामं मनरेगातून व्हावीत, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळावं, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावं यासह विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागण्यांवर सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. मोर्चा म्हणजे सरकारचा विरोध नाही, तर चळवळ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. दूध भेसळ गंभीर प्रश्न आहे. त्याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष झालं आहे. सरकारी योजनेतून शहरातील लोकांना अडीच लाखांचं घर आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखाचं घर देण्यात येणार आहे. ही अपमानीत करणारी योजना आहे, असंही ते म्हणाले.
बच्चू कडू यांच्या मोर्चाची अमरावतीत पोस्टर्स, बॅनर्स लागले आहेत. नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची, बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात “झुकेगा नही साला”… असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोरच हे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे सध्या हे पोस्टर्स चर्चेचा विषय झाले आहेत.