’40 आमदारांचा 2-3 महिन्यांचा खेळ उरलाय’, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच शिंदे गटाच्या आमदारांचा अवघ्या दोन ते तीन महिन्यांचा खेळ उरलाय, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. “40 गद्दारांचा दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलेला आहे”, असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. तसेच व्हीप हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मानला जाईल. तसेच सुनील प्रभू हेच प्रतोद मानले जातील. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये याबाबत उल्लेख केलेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “विधानसभेचे अध्यक्ष सुनावणी घेतील. हे 40 आमदार अपात्र होतील म्हणजे होतील कारण संविधान ते सांगतं. विजय हा सत्तेचा होणार. आजच्या ऑर्डरवर आम्ही स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.
“आज देशभरात दोन महत्त्वाचे निकाल आलेले आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तांसघर्षाचा आणि दुसरा म्हणजे दिल्लीच्या सत्तासंघर्षाचा. दिल्लीच्या राज्यपालांवरही सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. त्यांनादेखील काम करण्याची चौकट दिलेली आहे. राज्यपालांचं कार्यालय हे आपल्या देशात कदाचित हुकूमशाही चालवण्यासाठी वापरलं जातंय का? हा एक विचार करणं जरुरीचं आहे. राज्यांवर काही अधिकार ठेवला आहे की नाही? यावर महत्त्वाचा विचार होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी बारकाईन सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली असेल तर 40 गद्दारांचा दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलेला आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘पुढच्या घडामोडी महत्त्वाच्या’
“व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाळला जाईल. प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. मला वाटतं जे ऑर्डर आहे ते आपल्यासमोर येईलच. पण पुढची पावलं आता कशी होतील, काय घडामोडी होतील, यावर लक्ष देवून असायला पाहिजे. कारण हा वाद-विवाद संविधान आणि देशासाठी महत्त्वाचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांचं नेमकं मत काय?
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्हीप विषयी आपली भूमिका मांडली. “व्हीप कसा लागू करावा या संदर्भात कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, राजकीय पक्ष व्हीप अपॉईंट करेल. हे सांगितल्यानंतर कॉनक्लुडींग पॅरेग्राफ ‘जी’मध्ये त्यांनी संपूर्णपणे व्यवस्थित सांगितलं आहे की, कोणता गट हा राजकीय पक्ष आहे, या संदर्भातला निर्णय अध्यक्षांना घ्यायचा आहे. तो निर्णय घेतल्यानंतर निश्चित होईल की, व्हीप कोण लागू करु शकतं आणि कोणता व्हीप ग्राह्य धरला जाईल. आपल्या सर्व प्रक्रिया फॉलो करावी लागेल. मग आपल्याला त्याची उत्तरे मिळतील”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.