महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‘या’ ठिकाणी येणार
या युतीची घोषणा दादरच्या आंबेडकर भवनात केली जाणार आहे. आंबेडकर भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात येणार आहेत.
मुंबई: आजपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची आज घोषणा करण्यात येणार आहे. या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार तर आहेच, परंतु, राज्यातील समाजकारण आणि राजकारण ऐंशी कोनात बदलून जाणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या युतीच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार!! संयुक्त पत्रकार परिषद 23 जानेवारी 12.30 आंबेडकर भवन नायगाव.. महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.. pic.twitter.com/PYkNeNAO0Y
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2023
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीची घोषणा होणार असल्याचं ट्विट केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर… महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
जागा वाटपावर भाष्य होणार?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करणार आहेत. यावेळी दोघेही युतीच्या किमान समान कार्यक्रमाची माहिती देणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच जागा वाटपावरही हे दोन्ही नेते भाष्य करण्याची चिन्हे असल्याचं सांगितलं जातं. तसेच या युतीच्या घोषणेवेळी महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षाचे नेते नसतील, अशी माहिती आहे.
पहिल्यांदाच या ठिकाणी
या युतीची घोषणा दादरच्या आंबेडकर भवनात केली जाणार आहे. आंबेडकर भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात येणार आहेत.
एरव्ही शिवसेनेच्या कोणत्याही मोठ्या निर्णयाची घोषणा मातोश्री किंवा शिवसेना भवनातून केल्या जातात. परंतु, शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा पहिल्यांदाच आंबेडकर भवनातून केली जाणार असल्यांने त्याला अधिक महत्त्व आलं आहे.
नवा भिडून मिळाला
प्रकाश आंबडेकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार आहेत. त्यामुळे आघाडीला नवा भिडू मिळणार आहे. महाविकास आघाडीत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष होते. समाजवादी पार्टीही या आघाडीत आहे. परंतु, आंबेडकर यांच्याशी युती केल्याने महाविकास आघाडीला आणखी एक भिडू मिळणार आहे.
राजकीय आणि सामाजिक परिणाम होणार
आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीने केवळ राजकीय समीकरणेच बदलतील असं नव्हे तर सामाजिक समीकरणेही बदलणार आहेत. आंबडेकर यांच्याशी युती केल्याने ठाकरे यांचं राजकारण बदलणार आहे. तसेच आंबेडकर यांचं राजकारणही बदलणार आहे. दोन्ही पक्षांचा भर हा समाजकारणावर अधिक भर असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात या युतीचे दूरगामी सामाजिक परिणाम होणार आहेत.
तसेच आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची महाराष्ट्रभर मोठी ताकद आहे. मुंबईतही मोठी ताकद आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील 14 महापालिकेत महाविकास आघाडीला आंबेडकर यांचा फायदा होणार आहे. तसेच आंबेडकर यांच्या वंचितलाही या युतीचा फायदाच होणार आहे. त्यामुळेही ही युती महत्त्वाची मानली जात आहे.