मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाला देखील वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकात भाजपच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील विरोध पक्षांच्या गोटातही उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. याशिवाय देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. आगामी निवडणुका या महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटात सध्याच्या घडीला महत्वाच्या घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. या निकालात काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुासर काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला अवघ्या 64 जागांवर समाधान मानावं लागताना दिसत आहे. दुसरीकडे जेडीएसला 19 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इतर 4 ठिकाणी अपक्ष आमदार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी भाजपला झटका देणारी आहे. कारण भाजपच्या हातून आता कर्नाटकातील सत्ता निसटण्याची चिन्हं आहेत. या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत.
कर्नाटकातील निवडणुकीत भाजपचा पराभव होत असल्याचं निदर्शनास येत असल्याचं समोर आल्यानंतर ठाकरे गटातील हालचालींना प्रचंड वेग आला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानी सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल जाहीर केलाय. या निकालात राज्यपालांच्या कृतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. तर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांच्या प्रतोद पदाची नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. असं असताना 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संभ्रम निर्माण करणारा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांसोबत बैठक बोलावत त्यांच्याशी बातचित केल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, ठाकरे गटाचे सर्व आमदार ‘मातोश्री’वर दाखल झाले. उद्धव ठाकरेंनी आमदारांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत कोर्टाच्या निर्णयावरून आमदारांच्या शंकाचे निरसन करण्यात आलं. कोर्टाच्या निर्णयानंतर आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी देखील माहिती मिळत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत कर्नाटक निकालावर चर्चा झाली. दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजपचे फोडाफोडीचं राजकारण करतंय हे लोकांना आवडलेलं नाहीय. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांसमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.