मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून त्याचं दर्शन घेतलं. यावेळी आंबेडकर यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं. थेट संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानेच औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंबेडकरांच्या या कृतीवर शिंदे गट आणि भाजपने जोरदार टीका केली आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनीही जोरदार टीका केली आहे. तर आंबेडकर यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ठाकरे गटाने आता याबाबतची आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हानच भाजपने उद्धव ठाकरे यांना केलं आहे. तर या संपूर्ण प्रकारावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वेगळा आहे. औरंगजेबाच्या मजारीवर ते गेले हा वंचित बहुजन आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याशी आमचं काही घेणंदेणं नाही, असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज वरळीत ठाकरे गटाचा मेळावा आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे आंबेडकरांवर टीका करणार का? या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल? आंबेडकरांच्या कृतीमुळे युतीवर परिणाम होणार का? या सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली म्हणून युतीवर परिणाम होणार नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकाराचं हिंदुत्व आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेसाठी जे जे करता येईल, ते ते त्यांनी केलं होतं. आता उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेऊन जात आहे, असं आंबेडकर म्हणाले. तसेच औरंजेब या देशात 50 वर्ष राज्य करून गेला. ते तुम्ही कसं नाकारणार? औरंगजेबाचा इतिहास कसा नष्ट करणार? औरंगजेब या देशात कुणामुळे सत्ता करू शकला? ज्या जयचंदामुळे औरंगजेब सत्ता करू शकला त्या जयचंदाला शिव्या घाला. औरंगजेबाला शिव्या घालून काय करणार? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.