मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदार अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी केली जात आहे. ३० जून २०२२ ला शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाली. त्यानंतर पुढचे दीड महिने केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोनच नेते सरकार चावलत होते. मंत्रिमंडळाशिवाय ४५ दिवस सरकार चालल्यानंतर ९ ऑगस्ट २०२२ ला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु त्याचे खाते वाटप १४ ऑगस्टला २०२२ ला झाले. त्यानंतर आजही काही मंत्र्यांकडे ८-८ खात्यांचा कारभार आहेत. यामुळे विस्ताराची मागणी होत आहे.
का होणार हिरमोड
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सर्वांना संधी मिळणार नाही. कारण शिंदे-फडणवीस सरकार सर्व रिक्त जागा भरणार नाही. हा विस्तार छोटेखानी असणार आहे. शिंदे गटाकडून सात अन् भाजपकडून सात जणांना संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला दिली. त्यानंतर उर्वरित लोकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ दिले जाणार आहे. रिक्त राहणारी १३ मंत्रीपदे ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात भरली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली दौऱ्यात चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यात दोन्ही नेत्यांनी आगामी कॅबिनेट विस्तारावर चर्चा केली. या नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाहांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांवर केंद्र सरकारचं मार्गदर्शन आणि सहाकार्यावर या भेटीत चर्चा झाली. या विस्तारात महिलांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार आहे. तसेच युवा नेत्यांना या कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येणार आहे. घरी किंवा बंगल्यावर बसून नाही तर फिल्डवर ऊतरून काम करणारे नेते कॅबिनेटमध्ये घ्या, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
यांना दूर ठेवणार
शिवीगाळ करणार, आक्षेपार्ह्य वर्तन करणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात येणार आहे. महायुतीवर लागलेला ५० खोके एकदम ओके या डागाला कामाच्या माध्यमातून उत्तर देण्यावर जोर देण्यात येणार आहे.
राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेय.
राज्य मंत्रिमंडळाप्रमाणे केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये शिंदे गटातील खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे.
का रखडला विस्तार
मत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होतं आहे. याबाबत त्यांच्या अंतर्गत काय चालू आहे हे मला माहीत नाही. आमदाराच काय विस्तार व्हावा ही सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे, असं संजय शिरसाट यांनी नुकतेच सांगितलं होतं.