मुंबई | 19 जुलै 2023 : राज्यात हवा तसा पाऊस आतापर्यंत पडलेला नाही, अशी तक्रार कालपर्यंत सर्वजण करत होते. पण आज पावसाने राज्यभरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पाऊस प्रचंड कोसळतोय. राज्यातील अनेक नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडी होतेय. कोकणात परशुराम घाटत तर दरड कोसळली आहे. याशिवाय कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी सारख्या ठाणे जिल्ह्यातील शहरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे, इतका प्रचंड पाऊस तिथे कोसळतोय. पावसामुळे रेल्वे सेवेवर प्रचंड मोठा परिणाम पडला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवाशी परत रेल्वे स्थानकातून बाहेर परतताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात आज जिकडेतिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा उभ्या आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल, याबाबत काहीच निश्चित अशी माहिती नाही. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेखाली उतरून रेल्वे रुळाच्या मार्गाने आपल्या घरी निघाले आहेत.
विशेष म्हणजे कल्याण-कसारा मार्गावरील लोकल वाहतूकदेखील बंद पडली आहे. कल्याण स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झालीय. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवर गाड्या उभ्या आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकांजवळ एकामागे एक अशा अनेक गाड्या उभ्या आहेत. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेला जाणारी वाहतूकही प्रचंड संत गतीने सुरु आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर प्रचंड पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पाऊस बंद झाल्यानंतर पाणी ओसरल्यावर ही वाहतूक पूर्वरत होण्याची शक्यता आहे. पण वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे तुफान हाल होत आहेत. अनेकजण आता मुंबईहून कल्याणच्या दिशेला यायला निघत असतील. त्यामुळे पाऊस असाच सुरु राहिला तर या प्रवाशांपुढील आव्हानं वाढण्याची भीती आहे.
पावसामुळे आता कल्याण-डोंबिवली वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच सध्या तरी सीएसएमटी ते डोंबिवली अशी वाहतूक सुरु आहे. पण त्यापुढील वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.