मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव ते कोल्हापूरपर्यंत सर्वदूर राज्यात पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालीय. अनेक गावांना पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरात रेल्वे सेवा ठप्प झालीय. सध्या तरी मुंबई ते डोंबिवली वाहतूक सुरु आहे. पण अंबरनाथ, बदलापूरहून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झालीय. पण मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प झालीय. कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. हवामान विभागाने पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 163 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्याना पूर आलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांना पावसाने अशरश: झोडपून काढलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूणमधील वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबासावित्री आणि पाताळगंगा नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे.
मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजौली, हालेवारा, एटापल्ली गावातील नागरिकांना स्थळांतरीत करण्यात आलं आहे. रायगड, गडचिरोली, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाण्यात जिल्हाधिकारी उद्याची परिस्थिती पाहून सुट्टीचा निर्णय घेतील.
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 163 मिमी पावसाची नोंद झालीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 118.6 मिमी पावसाची नोंद झालीय. मुंबई शहरात आतापर्यंत 98.4 मिमी पावसाची नोंद झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात 93 मिमी पावसाची नोंद झालीय. ठाणे जिल्ह्यात 80.4 मिमी पावसाची नोंद झालीय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. पुढच्या 24 तासांमध्ये कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये कदाचित भरपूर पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलं आहे.
19/07,IMD GS model guidance possibility of hv to vhy with extremely hv rain at isol places during nxt 24hrs in parts of N Konkan & adj N areas
Palghar,Raigad HV-VHY & Extremly HV at isol stns
Mumbai,Thane,Rtn,Sindhudurg HV-VHY
Ghat areas HV-VHY
Marathwada,Vidarbha mod Hv with TS pic.twitter.com/AD2QLfDaiM— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2023
याशिवाय मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाट परिसरात प्रचंड पाऊस पडू शकतो. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.