जळगाव : संपूर्ण राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये जळगावमध्ये माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामध्ये राज्यात चर्चचा विषय ठरलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीला खोक्यांचा मुद्दा आरोप प्रत्यारोपांसाठी महत्वाचा ठरू लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये खोक्यांचा वापर झाल्याचा गंभीर एकनाथ खडसे यांनी केला आहे. तर पायाखालची वाळू सरकली म्हणून खडसे बेनगुडाचे आरोप करत आहेत. असं मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.
खरंतर आज होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व चाचणी आहे, आज महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान होत आहे. यामध्ये जोरदार खोक्याचा वापर झाल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील चित्र जर पाहिलं तर ग्रामपंचायत आणि सोसायटी मूळ मतदार असतात त्यामुळे या मतदारांचा कौल कुणाकडे आहे असं लक्षात येतं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त यश मिळालेले तुम्हाला दिसेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
त्यावर पलटवार करतांना शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. खोके कोण वाटतं आणि खोक्याचे नियोजन कोणी केलं हे तुम्हा सर्वांना माहित आहे, आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार, पैसे देणारे तर समोर प्रस्थापित आहेत.
उद्याचा निकाल स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतोय आणि पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून एकनाथराव खडसे आरोप करत आहेत, बहुमताने परिवर्तन होईल आणि आमचाच पॅनल विजय होईल असा विश्वास देखील मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
खरंतर राज्याच्या राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण पातळीवर राज्यात पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील मतदार असणार आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील नेते ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राजकारणातील दिग्गज नेतेही यामध्ये उतरले आहेत. बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असतांना मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.