मुंबई । 3 ऑगस्ट 2023 : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपविले. बुधवारी सकाळी ४.३० च्या सुमारास त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. या घटनेमुळे कलाविश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. आर्थिक अडचणी वाढल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असे म्हटले जात आहे. त्यातच नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यातील काही ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांचा उल्लेख आहे. हाच धागा पकडून आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी अधिक व्यापक स्वरूपात करावी अशी मागणी केली.
नितिन चंद्रकांत देसाई यांनी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. पण, दुर्दैवीरित्या त्यांनी आपले जीवन संपवले. देसाई यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले. त्याचे व्याज धरून एकूण २५२ कोटी झाले. परंतु, व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनी आणि रशेष शाह नावाची व्यक्ती याचा यात काही सहभाग आहे का? या कंपन्या आधुनिक सावकार आहेत. त्यांची अन्य दोन प्रकरणे आहेत. त्याची माहिती आपल्याकडे आहे. लवकरच ही माहिती गृहमंत्री यांच्याकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर बोलताना या सगळ्या गोष्टीची चौकशी सरकार करेल. नितीन देसाई यांचा स्टुडिओ सरकारला कसा ताब्यात घेता येईल याची कायदेशीर बाबी तपासू. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस या कंपन्यांची चौकशी केली जाईल, अशी महत्वाची घोषणा केली.