सुन्न करणारं सारं काही, बुलढाण्यातील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 25 प्रवाशांच्या मृतदेहांवर उद्या सामूहिक अंत्यसंस्कार
बुलढाण्यात बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळखही पटलेली नाही.
बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राज्यभरात या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याने या प्रवाशांची ओळख पटणं कठीण आहे. सरकार प्रवाशांच्या मृतदेहांचे डीएनए टेस्ट करुन अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन करणार असल्याची माहिती समोर आलेली. पण आता सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती दिली आहे. सर्व मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी सामूहिक अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पावलेल्या 25 प्रवाशांच्या मृतदेहांवर उद्या सकाळी आठ वाजता बुलढाण्यातील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहे. सामूहिक अंत्यसंस्काराला मृतक प्रवाशांच्या कुटुंबानी संमती दिली आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
…म्हणून सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आला
“मृतदेहाच्या डीएनए टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या हाती द्यायचे झाल्यास सहा ते सात दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आलाय”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
“पुणे, नागपूर, संभाजीनगर, अमरावतीमधील फॉरेन्सिक लॅबचे एक्सपर्ट या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आम्ही अधिकारी आणि सगळ्यांशी चर्चा केलीय. आम्ही सर्वांना समजून सांगितलं की, अशी परिस्थिती आहे, त्यानंतर सर्वजण तयार झाले आहेत”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
“सर्व 25 प्रवाशांच्या मृतदेहांवर उद्या बुलढाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वांना विचारून हा निर्णय घेण्यात आला आहे. थांबण्याची मनस्थिती कोणाची नाही. सामूहिक अंत्यसंस्कारासाठी सगळेजण तयार झालेले आहेत. सगळ्यांनी संमती दिलेली आहेत आणि लेखी देखील त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
मृतदेहांच्या नातेवाईकांचा आक्रोश
बुलढाण्यातील अपघाताच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेमुळे मृतकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत प्रचंड आक्रोश केलाय. हा अपघात इतका भीषण आहे की, आपल्या माणसाचा नेमका मृतदेह कोणता आहे हे देखील ओळखता आलेलं नाही. कदाचित या रात्रीचा प्रवास टाळता आला असता तर अपघातात आपल्या कुटुंबातील सदस्याचा जीव वाचला असता, अशी भावना मृतकांच्या नातेवाईकांच्या मनात येवून गेलाय. मृतकांच्या नातेवाईकांकडून घटनास्थळी केला जाणारा आक्रोश हा नि:शब्द आणि सुन्न करणारा आहे.