मुंबई । 24 जुलै 2023 : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाचे बॅनर लागले. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाणार. तर, एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने ही अखेरची भेट आहे, अशा अनेक चर्चानी जोर धरला होता. या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढविणार असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या सत्ताप्रवेशामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते रिक्त आहे. अशातच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे भाकीत वर्तविले आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेच नाहीत अशी परिस्थिती आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यामुळे शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली.
विधानसभेत अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आहेत हे अदयाप स्पष्ट झालेले नाही. मात्र, विधानसभेत राष्ट्रवादीपेक्षा आमचे संख्याबळ जास्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हालाच मिळावे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. परंतु, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरु होऊनही अदयाप काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. यावर, काँग्रेसच्या एका नेत्याने मोठा दावा केला आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठीची नावे दिल्ली हायकमांडला पाठविण्यात आली आहे. या नावावर विचार झाला असून मंगळवारी या नावाचाही घोषणा दिल्लीतून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करतील अशी माहितीही या नेत्याने दिली. विरोधी पक्षनेते पदासाठी आक्रमक चेहरा देणार असून तो पक्षनिष्ठ असेल. त्याच्या राजकीय कारर्कीदीचा प्रवास आदी बाबींचा विचार करून ही निवड केली जाईल असेही या नेत्याने सांगितले.
विरोधी पक्षनेते पदासाठी तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून पुण्यातील भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव अधिक चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक संग्राम थोपटे यांच्याकडे निरीक्षक आणि प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. संग्राम थोपटे यांची व्यूहरचना आणि रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसने खिंडार पाडले होते.