NEET Success Story : एका वर्षात तीन धक्के, आई, वडील आणि भावाच्या मृत्यूनंतरही खचली नाही; NEETमध्ये मिळवलं घवघवीत यश
ती डॉक्टर व्हावी असं तिच्या आईवडिलांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. पण वर्षभरात एकामागून एक धक्का बसला. आईवडील आणि भावाचा मृत्यू झाला. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. ती एकाकी पडली.
नांदेड : शेतात काम करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणीने नीटची परीक्षा क्रॅक केली आहे. कोणताही क्लास लावला नव्हता. कोणत्याही कोचिंगला गेली नाही. आर्थिक परिस्थितीमुळे या तरुणीला ते शक्य नव्हते. शेतात सहा तास काम करायचे आणि अभ्यास करायचा. या दिनक्रमातूनच तिने परीक्षेत यश मिळवलं. ही घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये आणखी एका मुलीने नीटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक आयुष्यातील दु:ख पचवत, न डगमगता तिने अभ्यास सुरू केला आणि त्यात तिने यश मिळवलं. त्यामुळे या मुलीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिभा वाठोरे असं या तरुणीचं नाव आहे. ती नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडफ गावात राहते. वर्षभरात तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. वर्षभरात तिच्या आई, वडिलांसह भावाचं अकाली निधन झालं. त्यामुळे तिच्या डोक्यावरचं छप्परच उडालं. आता कसं होणार? असा प्रश्न तिला सतावत होता. तेवढ्यात तिला नातेवाईकांनी हात दिला. नातेवाईकांनी आधार दिल्यानंतर तिनेही आई, वडील आणि भाऊ गेल्याने खच्चून न जाता नातेवाईकांच्या घरी राहून नीटची तयारी सुरू केली. अन् नीटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. आता तिला डॉक्टर व्हायचं आहे. तिला केवळ डॉक्टर व्हायचं नाही तर डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची आहे. प्रतिभाच्या पुढील शिक्षणा अनेक अडचणी येणार आहेत. आर्थिक अडचणींना तिला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे अनेकांनी तिला मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे.
जिद्दीला बळ मिळालं
प्रतिभाने नीटची परीक्षा सुरू केली तेव्हा तिच्यापाठी अनेक जण उभे राहिले. प्रा. महेंद्र नरवाडे. शिक्षक राहुल वाठोरे, कृषी अधिकारी भारत वाठोरे, प्रा. देवराव वाठोरे, यशवंत वाठोरे, संजय वाठोरे आणि प्रा. भास्कर दवणे यांनी तिला मार्गदर्शन केलं. तिला प्रोत्साहन दिलं. तसेच तिच्या अडीअडचणीला उभे राहिले. त्यामुळे तिलाही बळ मिळालं आणि तिने यश संपादन केलं.
किती मार्क मिळाले?
प्रतिभाने कोणत्याही क्लासला प्रवेश घेतला नाही. तेवढे पैसे तिच्याकडे नव्हते आणि कुणाला मागताही येत नव्हते. त्यामुळे तिने घरीच स्वत:हून अभ्यास करण्यास सुरुवात केली. मित्र आणि मैत्रीणींकडून नोट्स मागवून घेऊन त्यावरच तिने नीटची तयारी सुरू केली. त्याचं फळही तिला मिळालं. नीटच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिला 584 गुण मिळाले आहेत. तिच्या या यशामुळे तिच्या नातेवाईक आणि मदत करणाऱ्यांना आनंद तर झालाच आहे. पण तिच्या गावातील ग्रामस्थांनाही आंनंद झाला आहे. दु:खाचा डोंगर कोसळूनही कोलमडून न जाता तिने गाठलेल्या यशाबद्दल तिचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.