नागपूर : मागच्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू हे सरकारवर नाराज असल्याच दिसतय. सातत्याने त्यांनी सरकार विरोधात भूमिका घेतल्याच पहायला मिळालय. प्रत्येकवेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी आमदार बच्चू कडू यांच नाव चर्चेत असतं. मंत्रिपदाबद्दलची त्यांनी आपली भूमिका देखील बोलून दाखवलीय. आता आमदार बच्चू कडू यांनी थेट अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. कलावतीच्या मुद्यावरुन बच्चू कडू यांना शाह यांना लक्ष्य केलं.
यवतमाळच्या कलावतीच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी राहुल गांधीं यांच्यासह अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
‘खोटं बोलण हा चिंतेचा विषय’
“कलावती यांच्या बाबतीत पाहिला मूर्खपणा राहुल गांधींनी केला आहे. आता त्यापेक्षाही मूर्खपणा अमित शहा यांनी केला. अमित शाह लोकसभेत जे काही बोलले, ते सर्व खोटे बोलले. अमित शाह यांनी एवढं मोठ बोलताना विचारपूर्वक बोलायला पाहिजे होतं. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येत आहे. प्रत्येक गोष्ट भाजप खोट बोलते असा प्रचार झालेला आहे” असं बच्चू कडू म्हणाले. ‘कलावतीच्या विषयावर अमित शाह यांनी खोटं बोलण हा चिंतेचा विषय आहे’ असे बच्चू कडू यांनी सांगितलं.
‘बाकी लोकांना भोपळा देत असेल तर त्याला त्याला आमचा विरोध आहे’
“एका कलावतीला घर बांधून देऊन वीज देऊन राहुल गांधी यांनी देखावा केला, तेव्हा तुमचं सरकार राज्यात केंद्रात, होतं तर धोरण आखायला पाहिजे होत. एका कलावतीला घर देणं हे चुकीच आहे. कोट्यावधी लोक एका बाजूने घरासाठी रांगेत उभे असताना एका व्यक्तीच्या घरी जाऊन जर राजा उदार होत असेल तर बाकी लोकांना भोपळा देत असेल तर त्याला त्याला आमचा विरोध आहे” असं बच्चू कडू म्हणाले.
अमित शाह कलावतीच्या मुद्यावर काय म्हणाले?
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शाह म्हणाले की, “राहुल गांधी कलावतीच्या घरी राहून आले, तिथे भोजन केलं. ही चांगली बाब आहे पण त्या कलावतीला घर, वीज कोणी दिली? ती नरेंद्र मोदी सरकारने दिली”