कराची | 19 ऑगस्ट 2023 : दहशतवादी आणि भारतातील फुटीरतावादी गटाचा नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सल्लागार बनली आहे. पाकिस्तानचे केअर टेकर पंतप्रधान अनवार उल हक काकड यांनी त्यांच्या कॅबिनेटची घोषणा केली. त्यात मुशाल यांचा समावेश करण्यात आला आहे. मुशाल दोन कारणाने सतत चर्चेत राहिली आहे. एक म्हणजे भारतविरोधी विधानं करणं आणि दुसरं म्हणजे दहशतवादी आणि फुटीरतावादी नेत्याची पत्नी असणं. मुशालचा पती आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंड या फुटीरतावादी संघटनेचा नेता यासिन मलिक याला गेल्या वर्षी टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवऱ्यावर कोणताही आरोप असला तरी मुशालने सतत नवऱ्याचीच बाजू घेतलेली आहे.
मुशाल पाकिस्तानात मंत्री झाल्यानंतर यासिन आणि मुशालची लव्ह स्टोरीही व्हायरल झाली आहे. मुशाल ही पाकिस्तानच्या कराचीमधील एक सधन कुटुंबातील आहे. 2005मध्ये तिची भेट यासिन मलिकशी झाली. त्यावेळी काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी यासिन मलिकचे प्रचंड प्रयत्न सुरू होते. त्यासाठी तो काश्मीरच्या तरुणांचा ब्रेन वॉश करत होता. 2005मध्ये तो पाकिस्तानात गेला होता. तिथे त्याने भाषण केलं होतं. मिशन काश्मीरसाठी त्याने पाकिस्तानच्या लोकांचं समर्थनही मागितलं होतं.
यावेळी त्याने भाषणात फैज अहमद फैज यांचे काही शेर म्हटले होते. त्या कार्यक्रमाला मुशाल तिच्या आईसोबत आली होती. यासिनचं भाषण ऐकून ती इतकी प्रभावीत झाली होती की तिने जाऊन थेट यासिनचा ऑटोग्राफ मागितला होता. तसेच तिने यासनचं प्रचंड कौतुकही केलं होतं. इथूनच या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. त्यामुळेच यासिनने मुशालला काश्मीरच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आमंत्रणही दिलं होतं.
मुशालचे वडील एमए हुसैन अर्थतज्ज्ञ आहेत. तिची आई रेहाना पाकिस्तानी मुस्लिम लीगची लीडर आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमात मुशालला भाग घेता आला आहे. त्यातून तिला यासिनची मदतही करता आली. अनेक वर्ष दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर एक दिवस सौदी अरबमध्ये हज यात्रेवेळी यासिनची आई आणि मुशालची आई भेटली. त्यावेळी दोघींमध्ये यासीन आणि मुशालच्या लग्नाचा विषय निघाला आणि 22 फेब्रुवारी 2009मध्ये दोघांचं लग्न लावून देण्याचं ठरलं. लग्नानंतर या दोघांना एक मुलगी झाली. तिचं नाव रजिया सुल्तान असं ठेवण्यात आलं आहे.
यासिन आणि मुशालच्या लग्नाचा पाकिस्तानात जल्लोष करण्यात आला. तर भारतात त्यावर टीका झाली. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या योजनेचा एक भाग असल्याचं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये त्यावेळी म्हटलं होतं. भारत आणि पाकिस्तानच्या वैरामुळे यासिन आणि मुशालचे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणार नसल्याचं सांगितलं जात होतं. पण हे वृत्त चुकीचं निघालं.
मुशाल ही व्यवसायाने आर्टिस्ट आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून तिने पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे. पेटिंगमध्ये तिची रुची आहे. ती कविता लेखनही करते. मुशाल सध्या इस्लामाबादमध्ये राहते. पती यासिनच्या सुटकेसाठी तिच्या कुरापती सुरू आहेत. तिला आता पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये खास पद देण्यात आलं आहे. तिला पंतप्रधानांच्या मानवाधिकार आणि महिला सशक्तीकरण संबंधीत विभागाची सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. मात्र, पाकिस्तानातून तिच्याबाबतच्या नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.