मुंबई: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या महिन्याभरानंतरही थिएटरमध्ये याचे शोज हाऊसफुल्ल होते. नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. 24 नोव्हेंबरपासून कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे. एकीकडे थिएटरमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी गर्दी केली होती. मात्र आता अचानक ओटीटीवर कांतारा प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळतोय. ‘कांतारा’ अचानकच लोकांना का आवडू लागला नाही, ते जाणून घेऊयात..
ज्यांनी ‘कांतारा’ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, त्यापैकी बहुतांश लोकांना क्लायमॅक्स सीन प्रचंड आवडला. या सीनचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. ‘कांतारा’च्या क्लायमॅक्समधील प्रेक्षकांना आवडलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘वराह रुपम’ हे गाणं. मात्र याच गाण्यामुळे आता चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू मिळतोय. कारण ओटीटीवरील चित्रपटाच्या व्हर्जनमधून हे गाणंच काढून टाकण्यात आलं आहे.
‘वराह रुपम’ या गाण्यावर कॉपीराईट्सचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे चित्रपटातून हे गाणं हटवण्यात आलं. या चित्रपटाने जगभरात 400 कोटी रुपयांपेक्षाही जास्त कमाई केली. मात्र आता वराह रुपम या गाण्यामुळे चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय.
कांतारा चित्रपटातील वराह रुपम या गाण्याविरोधात केरळमधील ‘थेक्कुडम ब्रिज’ या रॉक बँडद्वारे तक्रार दाखल करण्यात आली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवरसम’ या चित्रपटातील गाण्याची कॉपी केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला. या रॉक बँडने कोर्टात दाद मागितली. तेव्हा कोर्टाने रॉक बँडच्या बाजूने निर्णय दिला. चित्रपटातून ते गाणं काढून टाकण्याचा आदेश कोर्टाने दिला.
कोर्टाच्या निर्णयामुळे कांताराच्या निर्मात्यांना ‘वराह रुपम’ हे गाणं जसंच्या तसं वापरता आलं नाही. त्यामुळे त्याचे बोल तेच ठेवत त्यांनी ट्युनिंगमध्ये बदल केले. मात्र बदललेलं गाणं प्रेक्षकांना अजिबात आवडलं नाही. ‘गाण्यात बदल करून चित्रपटाचा आत्मात मारला’, असं एकाने म्हटलंय. तर ‘जुन्या वराह रुपम गाण्याला पुन्हा आणा’ अशी मागणी काही युजर्सनी केली.