विशाखापट्टणम: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा याने सोमवारी (23 जानेवारी) आत्महत्या केली. विशाखापट्टणम इथल्या राहत्या घरी या अभिनेत्याने आत्महत्या केली. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. सुधीर वर्माने त्याच्या खासगी आयुष्यातील काही समस्यांमुळे आत्महत्या केल्याचं समजतंय. तो 33 वर्षांचा होता. सहकलाकार सुधाकर कोमकुला याने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. सुधीरच्या आत्महत्येनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुधीरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
‘तुझ्याशी भेट होणं आणि तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. पण आज तू नाहीय, यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे’, अशी पोस्ट सुधाकरने लिहिली. सुधाकर आणि सुधीर यांनी ‘कुंदनपू बोम्मा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
सुधीरने 2013 मध्ये ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्याच्या या पदार्पणाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतरच्या ‘कुंदनपू बोम्मा’ या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.
Sudheer! @sudheervarmak Such a lovely and warm guy’ It was great knowing you and working with you brother! Can’t digest the fact that you are no more! Om Shanti!??? @iChandiniC @vara_mullapudi @anil_anilbhanu pic.twitter.com/Sw7KdTRkpG
— Sudhakar Komakula (@UrsSudhakarK) January 23, 2023
सुधीरच्या करिअरमधील दुसरा चित्रपट ‘दोचे’ हासुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. यामध्ये त्याच्यासोबत नाग चैतन्यची भूमिका होती. मात्र केशवा आणि रणरंगम यांसारख्या चित्रपटांमुळे सुधीर प्रकाशझोतात आला.
2022 मध्ये त्याच्या ‘साकिनी दाकिनी’ या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटाला भरपूर यश मिळालं. यामध्ये त्याच्यासोबत निवेता थॉमस आणि रेगिना कॅसँड्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिडनाइट रनर्स’ या साऊथ कोरियन चित्रपटाचा हा रिमेक होता.
काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनं कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या 21 व्या वर्षी तुनिशाने जगाचा निरोप घेतला होता.