राम गोपाल वर्माने RRR चे दिग्दर्शक राजामौली यांना दिली जीवे मारण्याची धमकी; नशेत केलं ट्विट
'बाहुबली' या चित्रपटानंतर राजामौलींच्या हिट फॉर्म्युल्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. गेल्या 12 वर्षांत त्यांनी 12 ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यामुळे त्यांना 'मिडास टच'चे दिग्दर्शक असंही म्हटलं जातं.
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे सध्या यशाच्या शिखरावर आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत त्यांच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्यांच्या RRR या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खास ओळख मिळाली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. त्यांचं हे यश दृष्ट लागण्यासारखंच आहे. हेच यश पाहून आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने चक्क राजामौलींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
हे ऐकून तुम्हा आश्चर्य वाटेल, मात्र हे सत्य आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्माने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने लिहिलंय, ‘..आणि सर एस. एस. राजामौली, कृपया स्वत:ची सुरक्षा वाढवून घ्या कारण भारतात चित्रपट निर्मात्यांचा एक समूह आहे, ज्यांनी ईर्षा आणि मत्सरमुळे तुम्हाला जीवे मारण्यासाठी एक गट स्थापन केला आहे. या गटात मीसुद्धा सहभागी आहे. मी हे फक्त यासाठी सांगतोय कारण मी चार ड्रिंक्स प्यायलो आहे.’
राम गोपाल वर्माचं ट्विट-
And sir @ssrajamouli , please increase ur security because there is a bunch of film makers in india who out of pure jealousy formed an assassination squad to kill you , of which I am also a part ..Am just spilling out the secret because I am 4 drinks down
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 23, 2023
राम गोपाल वर्माच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याने हे ट्विट मस्करीत केलं असावं, असं काहीजण म्हणत आहेत. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर राजामौलींच्या हिट फॉर्म्युल्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. गेल्या 12 वर्षांत त्यांनी 12 ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यामुळे त्यांना ‘मिडास टच’चे दिग्दर्शक असंही म्हटलं जातं. राजामौलींच्या बाहुबली: द बिगनिंग, बाहुबली: द कन्क्लुज आणि RRR या चित्रपटांनी भारतात सर्वाधिक कमाई केली.
RRR या चित्रपटाचं जगभरातून कौतुक होत आहे. हॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ‘द वॅम्पायर डायरीज’चा अभिनेता जोसेफ मॉर्गन, कॉमिक बुक्स बॅटमॅन बियाँड आणि कॅप्टन अमेरिकाचे लेखक जॅक्सन लेंझिंग यांनीसुद्धा ट्विट करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं.