Pathaan | ‘पठाण’ पाहिल्यानंतर ‘रईस’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया चर्चेत; शाहरुखच्या चाहत्यांना म्हणाला ‘वेडेपणा’
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील अनेक थिएटर्समध्ये 'पठाण'चे हाऊसफुल शोज लागले आहेत. शाहरुखच्या 'रईस' या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांची पठाणवरील प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
मुंबई: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर ग्रँड कमबॅक केलं आहे. त्याचा अॅक्शन-पॅक्ड ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील अनेक थिएटर्समध्ये ‘पठाण’चे हाऊसफुल शोज लागले आहेत. हा चित्रपट पाहिलेल्यांपैकी अनेकांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच शाहरुखच्या ‘रईस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांची पठाणवरील प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
राहुल यांनीसुद्धा पठाण चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करत चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सहा वर्षांपूर्वी आम्ही रईस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. आता पठाण प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्या चाहत्यांमध्ये आयमॅक्सच्या मोठ्या स्क्रीनवर हाऊसफुल शोमध्ये हा चित्रपट पाहण्याचा अनुभव अप्रतिम होता. अक्षरश: वेडेपणा’, असं त्यांनी लिहिलं आहे.
2017 मध्ये शाहरुखचा ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल ढोलकियाने केलं होतं. शाहरुख आणि मायरा खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
6 years ago we released #Raees – today was Day One for #Pathaan. An incredible experience watching it in a house full show on a huge IMAX screen, with the die hard fans of @iamsrk @deepikapadukone @TheJohnAbraham @BeingSalmanKhan !! Madness !!!
— rahul dholakia (@rahuldholakia) January 25, 2023
‘पठाण’मध्ये सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर लिहिलं.
ट्विटरवर नेटकऱ्यांकडून पठाणवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पठाण ही दोन विविध आइडिओलॉजीची कहाणी आहे. एक देशासाठी सर्वकाही पणाला लावणारा रॉ एजंट आहे तर दुसरा आपल्याच देशाविरोधात जाऊन शत्रूंशी हातमिळवणी करणारा जिम आहे. या दोघांची कथा फारच मनोरंजक आहे, मात्र काही त्यातील काही ॲक्शन सीन्स हे रिॲलिटीपासून दूर फक्त ड्रामा वाटू लागतात, असंही काहींनी म्हटलंय.