Kareena Kapoor | ‘पठाण’च्या वादादरम्यान ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर करीना कपूरची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटावरून वाद सुरू असताना करीनाची ही प्रतिक्रिया चर्चेत आहे. या चित्रपटातील 'बेशर्म रंग' या गाण्यावर देशभरात वाद सुरू आहे. यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला.
कोलकाता: एकीकडे शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटावरून वाद सुरू असताना आता अभिनेत्री करीना कपूरने ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्याच्याशी सहमत नाही”, असं म्हणतानाच करीनाने काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा फटका बसला. आमिर खान आणि करीनाच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाविरोधातही सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड होता. परिणामी बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
कोलकातामधील एका कार्यक्रमात बोलत असताना करीना म्हणाली, “जर असं घडलं तर आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करू शकणार? तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह कसा अनुभवणार? माझ्या मते प्रत्येकाला आयुष्यात आनंद आणि उत्साहाची गरज असते. जर चित्रपटच नसतील तर मनोरंजन कसं होणार?”
शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटावरून वाद सुरू असताना करीनाची ही प्रतिक्रिया चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावर देशभरात वाद सुरू आहे. यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड दृश्ये देणाऱ्या दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला.
‘लाल सिंग चड्ढा’च्या वेळीही करीनाने बॉयकॉट ट्रेंडवर मोकळेपणे भाष्य केलं होतं. “हा खूप सुंदर चित्रपट आहे, याच्याविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड चालवू नये. प्रेक्षकांनी मला आणि आमिरला स्क्रीन पाहावं अशी माझी इच्छा आहे. यासाठी आम्ही खूप प्रतीक्षा केली. त्यामुळे कृपया त्याच्यावर बहिष्कार टाकू नका”, असं ती म्हणाली होती.