गोवा: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांवरून टिप्पणी केली होती. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी महिलांच्या कपड्यांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. भारतीय महिला लग्नात वेस्टर्न ड्रेस किंवा गाऊन का परिधान करतात हेच मला समजत नाही असं त्या म्हणाल्या. याउलट त्यांनी घागरा-चोलीची निवड केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. गोव्यात पार पडलेल्या 53 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये त्या बोलत होत्या.
“प्रत्येक गोष्ट बदलली आहे. आता ज्या प्रकारचे चित्रपट बनवले जात आहेत.. माहीत नाही, पण सर्वकाही वेस्टर्नाइज्ड (पाश्चिमात्यकरण) झालं आहे. आजकालच्या मुली लग्नात गाऊन घालून येतात. आपल्याकडे घागरा-चोली, साड्या आणि सलवार-कमीज असा पोशाख आहे, तुम्ही त्याची निवड करा ना”, असं आशा पारेख म्हणाल्या.
“तुम्ही भारतीय कपडे का परिधान नाही करत? ते फक्त ऑनस्क्रीन हिरोइनला बघतात आणि त्यांची कॉपी करू पाहतात. आम्ही जाड असो किंवा कसंही.. पण स्क्रीनवर हिरोइनने जसे कपडे घालते आहेत, तसंच आम्ही पण घालणार असा अट्टहास असतो. हे पाहून मला फार दु:ख होतं. आपली संस्कृती किती सुंदर आहे”, असं त्या पुढे म्हणाल्या.
यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत काम का नाही केलं, याचंही कारण सांगितलं. “चार-पाच वर्षांपूर्वी असं वृत्त छापलं गेलं होतं की मला दिलीप कुमार आवडत नाहीत म्हणून मी त्यांच्यासोबत काम केलं नाही. पण हे खोटं आहे. मला नेहमीच त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. जबरदस्त नावाचा चित्रपट आम्ही दोघांनी साइन केला होता. त्यामध्ये आम्ही एकत्र काम करणार होतो. मात्र दुर्दैवाने तो चित्रपट रखडला”, असं त्यांनी स्पष्ट केलं.