Marathi Songs : बॉलिवूडलाही जमलं नाही ते मराठी मातीतल्या अहिराणी गाण्यांनी करुन दाखवलं, व्ह्यूजचे आकडे वाचाल तर चक्रावून जाल

अहिराणी गाणी प्रसिद्ध होण्यामागची अनेक कारणं आहेत. यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहिराणी गाण्यांची असणारी म्युझिक. गाण्यांच्या म्युझिकमध्ये असणारा 'गडमडूम डुम' हा रिदम म्हणजे गाण्याचा आत्मा. हा रिदम म्हणजे प्रेक्षकांच्या थेट काळजाला घातलेला हात.

Marathi Songs : बॉलिवूडलाही जमलं नाही ते मराठी मातीतल्या अहिराणी गाण्यांनी करुन दाखवलं, व्ह्यूजचे आकडे वाचाल तर चक्रावून जाल
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 4:39 PM

चेतन पाटील, जळगाव (खान्देश) : कलाकालाराला मरण नसतं असं बोलतात. फक्त कलाकाराने सकारात्मक राहणं आणि आपल्या कामात सातत्य ठेवणं जास्त गरजेचं असतं. आपलं काम सातत्याने अवितरपणे चालू ठेवलं तर आपल्या कामाची दखल निश्चितच घेतली जाते. आजच्या युट्यूबवर अहिराणी गाणी बनवणाऱ्या कलाकारांबद्दल तेच घडतंय. या अहिराणी कलाकारांनी बनवलेल्या गाण्यांपुढे अगदी हिंदी आणि मराठी गाणीही फेल होताना दिसत आहेत. अहिराणी गाणी एका मागोमाग एक रेकॉर्ड मोडताना दिसत आहेत. फक्त यूट्यूबच नाही तर इन्स्टाग्राम, शेअरचॅट, फेसबुक अशा अनेक माध्यमांमध्ये अहिराणी गाण्यांवरचे रिल्स व्हायरल होत आहेत. या अहिराणी गाण्यांना अल्पावधीत कोट्यावधी व्हूज मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब घरातील कलाकार आज जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय होत आहेत.

अहिराणी गाणी प्रसिद्ध होण्यामागची अनेक कारणं आहेत. यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहिराणी गाण्यांची असणारी म्युझिक. गाण्यांच्या म्युझिकमध्ये असणारा ‘गडमडूम डुम’ हा रिदम म्हणजे गाण्याचा आत्मा. हा रिदम म्हणजे प्रेक्षकांच्या थेट काळजात घातलेला हात.

विशेष म्हणजे या गाण्यांचे बोल एकदय रिअ‍ॅलिस्टिक वाटतात. कुठेही बडेजाव नाही. जे आहे ते असंच आहे. आणि त्यात बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये जसा कोरस डान्स असतो तसा बनवण्याचा प्रयत्न आणि सिनेमॅटिक टच, एकदम झक्कास! म्हणूनच तर ही गाणी इतकी व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

आम्ही तुम्हाला अशीच लोकप्रिय झालेल्या गाण्यांची माहिती देणार आहोत. अर्थात ती व्हायरल झाली आहेत त्यामुळे ती गाणी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असतील. पण आम्ही तुम्हाला या अहिराणी गाण्यांचा अर्थ देखील सांगणार आहोत.

सध्याच्या घडीतलं सर्वात प्रसिद्ध अहिराणी गाणं – हाई झुमका वाली पोर

अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाललाय. खान्देशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं आहे.

‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे या दोन तरुणांनी लिहिलंय. तसेच त्यांनीच हे गाणं तयार केलंय. या गाण्यात डान्स करणारा तरुण विनोद कुमावत आहे आणि हे गाणं भैय्या मोरे या तरुणाने गायलंय. भैय्या मोरेला हे गाणं गाण्यासाठी अंजना बर्लेकर या महिला गायिकेने साथ दिलीय. तर राणी कुमावत ही अभिनेत्री या गाण्यात विनोद कुमावत सोबत नृत्य करताना दिसत आहे.

या गाण्याने यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंतच्या अवघ्या एक महिन्यात तब्बल 35 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यू होतात, याचाच अर्थ 35 मिलियन म्हणजे तब्बल 3 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी अवघ्या एक महिन्यात हे गाणं पाहिलं आणि ऐकलं आहे.

आता आपण गाण्याच्या बोलकडे येऊयात. आम्ही तुम्हाला या गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ थोडक्यात सांगणार आहोत.

अहिराणी भाषेतील गाण्याचे बोल:

हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी नदी थडी ले चालनी हाई नदी थडी ले चालनी मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी प्यावाले ती थडी चालनी हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी तीना नजरना तो असा घावस मला वाटाय तो मना डाव स आशी दखी दखी करू नको घायल थोडी नजर दे तुना प्यारणी हाई झुमका वाली पोर…

उनपडे तुना साडीवर पोर ऐशी का मना गाडी वर अशी टकमक काय मानमान मखडाई राहिणी हाई झुमका वाली पोर..

मस्तानी मन नाव स तूच मना बाजीराव स तुना सांगे मी येसु साजन माले करिले तू मनी साजणी हाई झुमका वाली पोर…

गाण्याचा व्हिडीओ पाहा :

गाण्याचा मराठीत अर्थ

ही झुमकावाली पोरगी नदी तिरावरी चालली माझ्या राघ्या-वाघ्याची जोडी (बैलजोडी) पाणी प्यायला नदी तिरावर चालली

असं पाहून तू मला घायाळ करु नकोस थोडी नजर दे तुझ्या प्रेमाची हाई झुमका वाली पोरगी…..

ऊन पडे तुझ्या साडीवर, पोरी येशील का माझ्या गाडीवर अशी टकमक पाहून मनातल्या मनात काय लाजतेय ही झुमका वाली पोरगी…..

मस्तानी माझं नाव आहे, तूच माझा बाजीराव आहे तुझ्यासोबत येईन मी साजन, तू कर मला तुझी साजनी ही झुमका वाली पोरगी…..

माडी वहू तुले येईजाई कर मनं लगन

आता विनोद कुमावतच्या आपण आणखी एका गाण्याविषयी माहिती जाणून घेऊयात. विनोद कुमावतने वर्षभरापूर्वी एक गाणं यूट्यूबवरच प्रदर्शित केलं होतं. हे गाणं म्हणजे ‘कर मनं लगन’. या गाण्याला इतका प्रतिसाद मिळाला की, प्रत्येक लग्नात हे गाणं वाजयला लागलं. या गाण्याने गेल्या वर्षभरात तब्बल 51 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 51 मिलियन म्हणजे 5 कोटी 10 लाख व्ह्यूज. हा आकडा इतका साधासोपा मिळणं कधीच शक्य नाही. यासाठी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लागतो. विनोद कुमावत या तरुणाला हेच जमलं. त्याने प्रेक्षकांची नस ओळखली आणि त्यामुळे एकामागे एक अशी सुपरहिट गाणी तयार करण्यात त्याला यश मिळत आलंय.

गाण्याचे आहिराणी बोल:

माडी वहू तुले येईजाई कर मनं लगन माडी वहू तुले येईजाई कर मनं लगन माडी दमस तू काम करीकरी, दखायत नाही ते मनावरी, बशीबशीसनी तिले काम सांगजो, मना बायको ना जीववर लेजो मजा मारी, माडी माले ही व्हईजाई बायको, कर मन लगन

नहीं देखावत मना अप्पा ना हाल, मना लगनना टेन्शनमा उडी गयात त्याना बालं जाऊदे जमीजाई मनं यंदा, मनी माय नहीं ऐकत, तू सोबत चालं

मनी बायकोन्या हातन्या भाकऱ्या खायजो कर मन लगन

मना बापले सांगा कोणीतरी मनासारखा पोरगा यस्ले कोठेच भेटाव नहीं काम होत नहीं मनी धल्लीघाई तरी लगीन करानं ऐकस नहीं माडी नात्रस्ले तुना समायजो कर मन लगीन पाहा गाण्याचा व्हिडीओ :

मराठीत गाण्याचा अर्थ :

आई सून तुला येऊन जाईल कर माझं लग्न आई सून तुला येऊन जाईल कर माझं लग्न

आई काम करुन थकतेस तू हे मला पाहवत नाही तू बसूनबसून तिला काम सांगशील माझ्या बायको जिवावर मजा मारुन घेशील मलापण होऊन जाईल बायको, आई कर माझं लगन

माझ्या आप्पांचे (वडिलांचे) हाल आता पाहवत नाही, माझ्या लग्नाचा टेन्शमध्ये त्यांचे उडून गेले बाल, याऊदे यंदा माझं जमून जाईल माझी आई ऐकत नाही, तू (वडिलांना उद्देशून) सोबत ये

आई माझ्या बायकोच्या हातच्या भाकरी खाशील कर माझं लग्न

माझ्या बापाला सांगा कोणीतरी माझ्यासारखा मुलगा त्यांना कुठेच मिळणार नाही माझ्या म्हातारीकडून काम होत नाही तरी ऐकत नाही लग्न करायचं आई तुझ्या नातवंडांना सांभाळजो कर माझं लग्न

हे गाणं यूट्यूबवर इतर कलाकारांच्या चॅनल्सवरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यालाही मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे या गाण्याचा प्रतिसाद पाहता या गाण्याचं फिमेल व्हर्जनसुद्धा बनवण्यात आलं होतं. त्या गाण्यात मुलगी आपल्या आईला लग्न करण्यासाठी विनंती करते. ते गाणं देखील असं धम्माल विनोदी आहे. फिमेल व्हर्जनचं हे गाणं गायक भैय्या मोरे यांनी लिहिलं आणि गायलंय.

‘कर मन लगीन’ गाण्याचा व्हिडीओ पाहा :

या विनोदी गाण्यांनी खान्देशी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलंय. मुलीच्या आवाजातील गाण्याचा अर्थ ऐकल्यावर आपल्याला समजू शकतो. आम्ही आपल्यासाठी त्या गाण्याची देखील लिंक उपलब्ध करुन देत आहोत. आपलंही हे गाणं पाहून प्रचंड मनोरंजन होईल.

देख तुनी बायको कशी नाची रायनी

या दोन गाण्यानंतर आणखी एक गाणं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. वर्षभरापूर्वी आलेल्या या गाण्याने देखील यूट्यूबवर व्ह्यूजचे रेकॉर्ड मोडले होते. हे गाणं गायिका अंजना बर्लेकर यांनी गायलं आणि प्रदर्शित केलंय. अंजना या गाण्याच्या निर्मात्या देखील आहेत.

या गाण्यात अंजना यांना जगदिश संधानशिव या तरुण खान्देशी गायकायकाने साथ दिलीय. जगदिश संधानशिव यांचे देखील अनेक भारी अहिराणी गाणी प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या गाण्यांविषयी आम्ही सांगणार आहोतच. पण आधी देख तुनी बायको या गाण्याविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

देख तुनी बायको कशी नाची रायनी या गाण्याला अंजना यांच्या ऑफिशयल चॅनलवर जवळपाच पावणेसहा कोटी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. या गाण्यावर अनेक रिल्सही सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते आणि प्रचंड व्हायरल झाले होते. हे गाणं खूप मजेशीर आहे.

गाण्याचा व्हिडीओ पाहा :

गाण्याचा मराठीत अर्थ :

बघ तुझी बायको कशी नाचत आहे, कशी डोलत आहे, कशी बोलत आहे तिला सासऱ्याचा नाही धाक तिला सासूचा नाही धाक नुसते करते रुबाब आणि शायनिंग मारते

ती सांगते, ही नुसती झक्कास आहे माझा लटका-झटका एकदम वेगळा आहे बरी चांगली दिसत नाही नुसतं पावडर चोपडते आरशातच पाहते आणि पाहत पाहत खूश होते

माय, काय डोक्याला ताप करुन घेतला याने अशी सून आणली, भलतीच दीडशहानी बघ तुझी बायको कशी नाचत आहे….

तिच्या डोक्यावर इतकासा डोंगर आहे स्वत:ला किती सुंदर समजते ऐवढा मेकअप आणि ऐवढा शृंगार तरी दिसतेस तू किती भिकार

तिची चमचम साडी, सँडलपण भारी, पण चालताना ती त्यावर पडून जाते अशी तोंडावर पडली तिची सँडल तुटली, वाटलं तिला मग गिल्टी बघ तुझी बायको कशी नाचत आहे….

नुसती डिझेवाल्याला ही गाणी सांगते एक संपलं की लगेच दुसरं सांगते ही नुसती उड्या मारते आणि स्वत:ला कट्रीना कॅफ समजते माय अशी बाई आहे ही बिनालाजेची हिला सून म्हणायची शरम वाटते बघ तुझी बायको कशी नाचत आहे….

मुलगा बोलतो – माय कास सांगू आता तुला, कुठून पडून गेली ही माझ्या गळ्यात नुसती किटकिट करते माझ्यामागे थंडी लागू देत नाही माझ्या जीवाला घरात मला भांडी घासायला लावते नाही भांडी घासले तर मला खूप मारते सकाळी उशिरा उठते

ऑनलाईन ऑर्डर करते, पिझ्झा, बर्गर मागवते, एकटी एकटी खाते आणि मला मार खाऊ घालते बघ कशी बायको करुन घेतली मी मला जगूही नाही देत आणि ना मरुही देत

अशी कशी बायको करुन घेतली मी, मला जगूही नाही देत आणि मरुही नाही देत कशी नाचत आहे, कशी….

आते सोडी दे लगण ना नांद मना फुई भाऊ

गायक भैय्या मोरे याचं आणखी एक विनोदी आणि भन्नाट गाणं आहे. या गाण्याची निर्मिती विशाल महाजन यांनी केलीय. हे गाणं भैय्या मोरे या तरुण गायकाने गायलं आहे.

आजकाल तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींची संख्या फार कमीय असा विषय नाहीय. पण तरीही काही कारणास्वत मुलींकडची मंडळी फार पारखून आपल्या मुलीसाठी मुलगा निवडतात. पण त्याची झळ अनेक तरुणांना बसतेय. हीच व्यथा अतिशय विनोदी पद्धतीने या गाण्यातून व्यक्त करण्यात आलीय.

‘सोडी दे लगण ना नांद मना फुई भाऊ’ असे बोल या गाण्याचे आहेत. काही गोष्टी अतिशय मार्मिकपणे आणि विनोदी शैलीने गाण्यात सादर केलंय.

गाण्याचा व्हिडीओ पाहा :

गाण्याचे अहिराणी बोल:

आते सोडी दे लगण ना नांद नांद मना फुईभाऊ आणि नेशिले धोतर न पान पान मना फुई भाऊ

आपले घरदार नही आपले वावर नाही नाही वावर ना आपले बांद बांद मना फुईभाऊ आते पोरीसाना वाढी गया मान मान मना फुई भाऊ

आपले नोकरी नाही आपले धंदा नाही नाही पैसा नी खान मनुन लेऊ नको डोकले ताण ताण मना फुईभाऊ

आपल नात गोत चांगलं नाही देखी करतासा वाकडी मान उलटा भरी देतास पोरीसणा कान कान मना फुईभाऊ

आते सोडी दे लगन ना नांद नांद मना फुईभाऊ..

अहिराणी गाण्यांच्या इंडस्ट्रीतला सुपरस्टार – सचिन कुमावत

आम्ही आता तुम्हाला अशा एका कलाकाराची माहिती देणार आहोत ज्या कलाकाराचं नाव अहिराणी भाषेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाऊ शकतं. त्यांचं अहिराणी गाण्यांच्या इंडस्ट्रीमधील योगदान अगदी तसंच आहे. आज जे तरुण अहिराणी गाणी बनवत आहेत ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मार्गक्रमण करत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

या कलाकाराची संपूर्ण खान्देशात क्रेझ आहे. या कलाकाराचे प्रत्येक गाणी कित्येक वर्षांपासून हिट होत आहेत. मग ते ‘सावन ना महिना मा’ असूद्या किंवा ‘बबल्या इकस केसावर फुगे’ हे गाणं असू द्या. त्यांच्या या दोन गाण्यांविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तशी त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी तयार केली आहेत आणि कोट्यवधी प्रेक्षकांनी ती यूट्यूबवर पाहिली देखील आहेत.

‘बबल्या इकस केसावर फुगे’

‘बबल्या इकस केसावर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर तब्बल 266 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 266 मिलियन म्हणजे 26 कोटी 60 लाख प्रेक्षकांनी हे गाणं आतापर्यंत यूट्यूबवर पाहिलंय. इतकं गाणं अनेकदा बॉलिवूडचं किंवा मराठीचं देखील गाणं प्रसिद्ध होऊ शकत नाही, इतकं हे गाणं प्रसिद्ध झालंय. सचिन कुमावत यांनी तीन वर्षांपूर्वी हे गाणं प्रदर्शित केलं होतं.

‘सावन ना महिना मा’

सचिन कुमावत यांचं ‘सावन ना महिना मा’ हे गाणं चार वर्षांपूर्वी प्रदर्शित केलं होतं. या गाण्यालाही तब्बल 9 कोटी 70 लाख व्ह्यूज आहेत. यूट्यूबवर इतके व्ह्यूज मिळवणं हे सोपं नाहीय. सचिन कुमावत यांनी प्रदर्शित केलेलं हे एक रोमॅन्टिक गाणं आहे. या गाण्याचे अहिराणी शब्द मनाला स्पर्श करतात. त्यामुळे हे गाणं देखील चांगलंच लोकप्रिय ठरलंय.

सचिन कुमावत यांचं ‘वाडी वाडी चंदनवाडी’ हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालंय. हे गाणं दोन महिन्यांपूर्वी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला आतापर्यंत 1 कोटी 10 लाख प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

लोकप्रिय अहिराणी गायक आणि नायक – जगदिश संधानशिव

आता आम्ही तुम्हाला अहिराणी गाणी बनवणाऱ्या एक हुशार, सर्व गुणसंपन्न अशा तरुणाविषयी माहिती सांगणार आहोत. या तरुणाचं नाव जगदिश संधानशिव असं आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेला हा तरुण. या तरुणाने गायलेले, तयार केलेले गाणी आज खान्देशातील प्रत्येक लग्नात वाजताना दिसतात. त्यांच्या गाण्यावर अनेक रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘राजा तू मना राजा’ 

जगदिश संधानशिव या तरुणाने दहा महिन्यांपूर्वी ‘राजा तू मना राजा’ हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित केलं होतं. या गाण्याला आतापर्यंत 49 मिलियन म्हणजेच जवळपास पाच कोटी प्रेक्षकांनी अवघ्या दहा महिन्यात पाहिलं आहे. गाण्याचे बोल जितके सुंदर आहेत तितकंच सुंदर नृत्य या गाण्यावर करण्यात आलंय. त्यामुळे या गाण्यातील ‘जगदिश आणि श्रावणी’ची जोडी चांगलीच फेमस झालीय.

हे गाणं जगदिश यांच्यासोबत अंजना बर्लेकर यांनी गायलंय. अंजना यांचा काय आवाज आहे! हे गाणं ऐकल्यावर अंजना यांचा आवाज किती अद्भूत आहे याची प्रचिती निश्चितच येईल.

जगदिश यांचं आणखी एक गाणं चांगलंच लोकप्रिय झालंय. ‘तुना प्यार मा पागल वयना ये’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं त्यांनी यूट्यूबवर दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित केलं होतं. हे गाणं नवनव्याप्रकारे तयार करुन जगदिश यांनी यूट्यूबवर शेअर केले आहेत. त्या सर्व व्हिडीओजला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. पण या गाण्याचा मुख्य आणि पहिल्या व्हिडीओला आतापर्यंत साडेचार कोटी प्रेक्षकांनी पाहिलंय.

अहिराणी गाणी सोशल मीडियावर जो धम्माल उडवून देत आहेत त्याला तोड नाही. अहिराणी गाणी ही आताच लोकप्रिय होत आहेत असंही नाही. याआधीही अनेक गाणी, चित्रपट, गाण्यांचे कॅसिट यांनी आपापल्या स्तरावर मार्केटमध्ये राज्य केलंय. अहिराणी चित्रपटांनी तर एक काळ गाजवलाय. पण पायरसीने अहिराणी चित्रपटांची इंडस्ट्री पोखरत खिळखिळी केली. यामध्ये अनेक कलाकार उद्ध्वस्त झाले. अनेकांची घरंदारं बुडाली, अनेकजण देशोधडीला लागले. काही हाडाचे कलाकार आजही मैताला गाणी गाताना दिसतात.

पण तरीही आता येणारी परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. कारण या कलाकारांना स्वत:ची कला सिद्ध करण्यासाठी युट्यूबसारख्या माध्यमाची साथ मिळालीय. त्यामुळेच तर हे सर्व कलाकार आज कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.