मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूतचं सोमवारी निधन झालं. मुंबईतील अंधेरी इथल्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. वयाच्या 32 व्या वर्षी आदित्यने अखेरचा श्वास घेतला. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचं निधन झाल्याची चर्चा आहे. मात्र आदित्यच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे निधनाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. निधनाच्या एक दिवस आधीच त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती. आदित्य टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जायचा. त्याने काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. कमी वयात त्याने चांगली संपत्ती संपादित केली होती.
आदित्यचा जन्म दिल्लीत झाला आणि तिथेच तो लहानाचा मोठा झाला. त्याचे कुटुंबीय उत्तराखंडचे आहेत. आदित्यने दिल्लीतील ग्रीन फील्ड्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने रॅम्प मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. 25 हून अधिक जाहिरातींमध्ये तो झळकला होता. काही जाहिरातींमध्ये त्याने हृतिक रोशन आणि क्रिकेटर सौरव गांगुलीसोबत स्क्रीन शेअर केलं होतं. दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर त्याने ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. त्याने बऱ्याच रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता.
आदित्यची एकूण संपत्ती जवळपास 41 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं समजतंय. ‘क्रांतिवीर’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटांसह एमटीव्ही या वाहिनीवरील ‘स्पिल्ट्सविला’ या रिअॅलिटी शोमध्येही आदित्य सहभागी झाला होता. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला असं काही रिपोर्ट्स म्हणतायत. तर बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. आदित्यच्या निधनाचं नेमकं कारण त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईलच.
गेल्या काही दिवसांपासून आदित्यची प्रकृती ठीक नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणीने पोलिसांना सांगितलं की आदित्यला गेल्या काही दिवसांपासून खोकला, ताप आणि उल्ट्या होत होत्या. तब्येत बरी नसतानाही त्याने रविवारी मित्रांसोबत पार्टी केली होती. या पार्टीमध्ये त्याने काही सेवन केलं होतं का, याबाबतची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट होईल.
मोलकरीणीने नोंदवलेल्या जबाबानुसार, आदित्य सोमवारी सकाळी 11 वाजता उठला आणि नाश्त्यात त्याने पराठा खाल्ला. त्यानंतर त्याला सतत उल्ट्या होत होत्या. म्हणून त्याने त्याच्या कुकला खिचडी बनवण्यास सांगितलं. दुपारी 2 ते 2.30 वाजताच्या सुमारास तो बाथरुममध्ये गेला. त्यानंतर नोकराला जोरात पडल्याचा आवाज ऐकू आला. बाथरुमकडे धाव घेतली असता आदित्य जमिनीवर पडलेला दिसले आणि त्याला किरकोळ दुखापतसुद्धा झाली होती.