नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल समोर (Karnataka Assembly Election 2023) आले असून राज्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा सत्ता गमावत असून पक्षाला अवघ्या 70 जागा मिळताना दिसत आहेत. जेडीएसनेही 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळत आहेत. दरम्यान कर्नाटकात मतमोजणी सुरू असताना दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर विजयाचे सेलिब्रेशन सुरू होते. मात्र एका दुर्घटनेमुळे ते भलतेच महागात पडले असते.
काँग्रेस मुख्यालयासमोर कार्यकर्ते विजयाचे सेलिब्रेशन करत फटाके फोडत होते. तेव्हा एक दुर्घटना घडली. मात्र काँग्रेस नेते थोडक्यात बचावले हा एक चांगला योगायोग होता, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. खरंतर काँग्रेस नेत्याने हातात पेटता फटाका हातात घेतला होता. मात्र त्यांचा तोल गेला आणि फटाक्यांनी भरलेला संपूर्ण बॉक्स जमिनीवर पडला. जमिनीवर पडूनही फटाके फुटणे सुरूच होते. त्यातील एक फटाका काँग्रेसच्या नेत्याच्या चेहऱ्याजवळ फुटला. सुदैवाने फटाका त्यांच्या जवळून वर गेला अन्यथा त्यांचा संपूर्ण चेहरा जळला असता.
या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक छोटासा निष्काळजीपणा अवघ्या काही सेकंदात कसा मोठा होतो हे आपण पाहू शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर दुसरा कार्यकर्ता पुढे आला आणि त्यानेही तीच चूक पुन्हा केली. एक नेता थोडक्यात बचावल्यानंतर दुसऱ्या कार्यकर्त्यानेही पेटता फटाका हातात उचलण्याची चूक केली. मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही.
#WATCH | Fireworks at AICC office in Delhi as the party crosses halfway mark in #KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/zNsy7OzPEl
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकमध्ये काँग्रेसच किंग
एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार जेडीएस राज्यात किंगमेकरची भूमिका निभावेल असं वाटत होतं. जेडीएसच्याच हाती सत्तेच्या चाव्या असतील असंही चित्र होतं. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान करत काँग्रेसला सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे राज्यात जेडीएसच्या हातात सत्तेच्या चाव्या राहणार नसल्याचं दिसत आहे. उलट यावेळी जेडीएसच्या जागा घटताना दिसत आहेत. त्यामुळे जेडीएसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल एवढं बहुमत मिळालं असलं तरी काँग्रेस जेडीएसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या हालचालींना दुपारनंतर वेग येईल असं समजतंय.
भाजपच्या जागा प्रचंड घटल्या
2018च्या निवडणुकीत 104 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळी भाजपला केवळ 68 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे भाजपाचे जवळपास 30 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. काँग्रेसला गेल्यावेळी 80 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला 127 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसला 47 जागा अधिक मिळताना दिसत आहे. तर जेडीएसला मागच्यावेळी 37 जागा मिळाल्या होत्या. यावेळी जेडीएसला फक्त 22 जागा मिळत आहेत. म्हणजेच जेडीएसला 15 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
कर्नाटकची ही निवडणूक भाजपसोबतच काँग्रेससाठीही महत्त्वाची होती. कारण भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी इतर राज्यांपेक्षा जास्त काळ कर्नाटकचा दौरा केला होता. ज्याचा परिणाम निकालांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.