नवी दिल्ली | 2 ऑगस्ट 2023 : अनेक जण जीवनात एक दोनदा अपयश आले तर लगेच निराश होतात. परंतू एक तरुणाला तब्बल सरकारी नोकरीच्या 35 परिक्षांमध्ये अपयश आले तरीही त्याने जिद्द सोडली नाही. आपले धैय्य कायम ठेवत त्याने प्रयत्न सुरुच ठेवले अखेर त्याच्या गळ्यात यशाने माळ घातली. या तरुणाने कलेक्टर पदासाठी पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करीत परीक्षा दिली आणि त्यांना यश मिळालेच..पाहा ही अनोखी सक्सेस स्टोरी
आपल्या जर प्रयत्न करताना यश मिळाले नाही तर निराश होण्याची काही गरज नाही. अपयश ही यशाचीच एक पायरी असते. परंतू आपण आपल्या चुकांचे समर्थन करायला नको याचा धडा एका तरुणाने दिला आहे. हरियाणाचे विजय वर्धन हे अपयशाने कधीच खचले नाहीत. त्यांनी नव्याने पुन्हा प्रयत्न केले. त्यांना नंतर यशाची चव चाखता आली. विजय 35 सरकारी परीक्षांमध्ये फेल झाले. परंतू अपयशाने त्यांना कधीच नाऊमेद केले नाही.
विजय वर्धन अनेकवेळा फेल झाले. परंतू त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने अपयशाचा कारणांचा धांडोळा घेतला आणि नव्याने परीक्षेला सामोरे गेले. अखेर ते आयपीएस अधिकारी बनले. परंतू त्यांना आयपीएस पसंत नव्हते, त्यामुळे पुन्हा त्यांनी प्रयत्न केला आणि आयएएस झाले.
वर्धन यांचे शालेय शिक्षण हरियाणाच्या सिरसा येथे झाले. तेथेच त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हिसार मधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनिअरिंगच्या डीग्रीनंतर त्यांनी यूपीएसएसीच्या अभ्यासासाठी दिल्ली गाठली. या तयारी दरम्यान विजय यांनी हरियाणात पीसीएस, यूपीएससी, एसएससी आणि सीजीएल सहीत कमीत कमी 35 परीक्षा दिल्या. परंतू त्या परीक्षांमध्ये ते अयशस्वी झाले. तरीही त्यांनी स्वत:वरचा विश्वास गमविला नाही. संघर्ष सुरुच ठेवला, अखेर 2014 मध्ये प्रथम युपीएससीला बसले त्यात त्यांना अपयश आले.
साल 2018 मध्ये विजय वर्धन यांना यश मिळाले. त्यांनी युपीएससीत 104 रॅंक मिळविला. त्यानंतर त्यांना आयपीएससाठी निवड झाली. परंतू त्यांना पोलिस सेवेत रस नव्हता. अखेर त्यांनी साल 2021 मध्ये पुन्हा युपीएससी साठी अर्ज केला. यावेळी ते आयएएससाठी निवडले गेले. विजय वर्धन म्हणतात तुम्हीच स्वत:ला बदलवू शकता. तुम्हीच स्वत:चे इस्ट्रक्टर आहात. त्यामुळे तुम्ही जेव्हा कोणताही निर्णय घ्याल तेव्हा स्वत:वर विश्वास ठेवा.