Mumbai Crime : मोबाईलवर वीज कंपनीचा मॅसेज आला अन् सात लाख उडाले, नेमकं प्रकरण काय?
हल्ली फेक मॅसेज पाठवून नागरिकांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार काय फंडे वापरतील याचा नेम नाही.
मुंबई / 26 जुलै 2023 : सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. एका महिलेला वीज बिलाच्या नावाखाली सात लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66C आणि 66D (संगणक संसाधनांचा वापर करून फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने ज्या खात्यात पैसे जमा झालेत, ते लाभार्थी खाते क्रमांक देखील दिले आहे. असे फेक मॅसेज पाठवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे अशा फेक मॅसेजपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर वीज कंपनीचा एक मॅसेज आला. या मॅसेजमध्ये तुमचे वीजबिल थकले असून, तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच या मॅसेजमध्ये संपर्क करण्यासाठी वीज अधिकाऱ्याचे नाव आणि नंबर देण्यात होता. त्यानंतर महिलेने मुलीला याबाबत माहिती दिली. मुलीने मॅसेजमध्ये दिलेल्या विद्युत अधिकाऱ्याच्या नंबरवर कॉल केला.
विद्युत अधिकाऱ्याने पीडितेला तिच्या फोनवर रिमोट ऍक्सेस अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 140 रुपये भरण्यास सांगितले. पीडितेने अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सूचनांचे पालन केले. यानंतर काही तासांतच पीडितेच्या आईचे नऊ व्यवहारांमध्ये बँक खात्यातून 7.07 लाख रुपये गमावले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.