कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा एकदा वाहनांचे जळीतकांड सुरु झाले आहे. चिंचपाडा गावात पुन्हा एकदा पार्किंग असलेल्या गाड्यांना आग लावण्याची घटना घडली आहे. या आगीत तीन मोटरसायकल आणि एक चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आग कोणी लावली आणि का लावली याचा तपास पोलीस करत आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा धाकच राहिला नाही हे या घटनेवरुन दिसून येते.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात पाण्याच्या टाकीजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. समाजकंटकांनी चार गाड्यांना आग लावली असून, या आगीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चिंचपाडा परीसरात रंदीप साळुंखे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. रंदीप आणि त्यांचा भाऊ उल्हासनगर परिसरात रिक्षा चालवतात. त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यावर चार गाड्या पार्किंग करण्यात आल्या होत्या.
रात्रीच्या वेळी मोठा आवाज झाला तेव्हा नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी साळुंखे कुटुंबीयांनी तळमजल्यावर धाव घेतली. यावेळी कोणीतरी अज्ञात इसमांनी वाहनांना आग लावल्याचे निदर्शनास आले. या आगीत 3 मोटार सायकल आणि एक चारचाकी गाडी जळाली आहे. याप्रकरणी रंदीप साळुंखे यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. विठ्ठलवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.