मुंबई : लोणावळा येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी 30 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने अटक केली आहे. आरोपी आपले नाव आणि ओळख लपवून मागील अनेक वर्षापासून मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहत होता. अविनाश भिमराव पवार (49 वर्षे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी विक्रोळी परिसरात टुरिस्ट गाडी चालवण्याचे काम करत होता. आरोपीने 30 वर्षांपूर्वी लोणावळ्यातील एका वृद्ध दाम्पत्याची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला आणि पकडू नये म्हणून नाव बदलून राहत होता. पण मुंबई पोलिसांपुढे त्याची चालाखी चालली नाही. अखेर पोलिसांनी त्याला हेरलाच आणि तुरुंगात टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील यशोधा बंगला, सत्यम सोसायटी या ठिकाणी 30 वर्षापूर्वी वयोवृध्द असलेले दाम्पत्य धनराज ठाकर्सी कुरवा आणि त्यांची पत्नी धनलक्ष्मी धनराज कुवा यांची त्यांच्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी अमोल जॉन काळे उर्फ टिल्लू आणि विजय अरुण देसाई या दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी अविनाश भिमराव पवार हा फरार झाला होता. लोणावळा पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले, मात्र आरोपी सापडला नाही.
आरोपी संदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली. आरोपी स्वत:चे मूळ नाव आणि ओळख बदलून मुंबईत वावरत आहे. मिळालेल्या माहितीवरून पथक नेमून आरोपीवर पाळत ठेवून त्याची माहिती मिळवली. आरोपीची एकंदरीत वागणूक संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन तपास केला. तपासात आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपले नाव अविनाश भिमराव पवार असे सांगून, तोच लोणावळा हत्या प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो सध्या नाव बदलून अमित भिमराज पवार या नावाने विक्रोळीत राहत होता.