गर्दीचा फायदा घेत महिलेचे गंठण खेचले, घटना सीसीटीव्हीत कैद
गंठण खेचताच मागे वळून पाहिले असता हिरव्या आणि निळ्या रंगाच्या साड्या घातलेल्या दोन महिला तोंडाला स्कार्फ बांधून पळताना त्यांनी पाहिले. ही सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कैद झाला आहे.
इंदापूर : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील गंठण खेचून दोन महिला चोरट्या पसार झाल्याची घटना इंदापूर बसस्थानकात घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना बसस्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा गोपाळ कांबळे असे लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
इंदापूर बसस्थानकात घडली घटना
शारदा कांबळे या आपल्या नातीसह दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूर बसस्थानकात इंदापूर-बारामती एसटी बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात महिलांनी त्याच्या गळ्यातील 3 तोळे 290 ग्रॅम वजनाची सोन्याची गंठण हिसकावून पळ काढला.
तोंडाला स्कार्फ बांधून पळताना महिला सीसीटीव्हीत कैद
गंठण खेचताच मागे वळून पाहिले असता हिरव्या आणि निळ्या रंगाच्या साड्या घातलेल्या दोन महिला तोंडाला स्कार्फ बांधून पळताना त्यांनी पाहिले. ही सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कैद झाला आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
यानंतर शारदा कांबळे यांनी इंदापूर पोलीस ठाणे गाठत अनोळखी महिलांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास करत इंदापूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
अत्यंत वर्दळीचे ठिकाण असल्याने चोरीचे प्रमाण अधिक
इंदापूर हे महत्वाचे ठिकाण आहे. महामार्गावरुन येथे अहोरात्र वर्दळ सुरु असते. एसटी बस स्थानकात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील एसटी बस येत असतात. प्रवासी संख्या पाहता त्यांच्या सुरक्षिततेची काळजी येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात घेतली जात नाही.
दागिने हिसकावण्याचा प्रकार येथे नेहमी घडत असतो. मात्र या ठिकाणी पोलीस कधीच नसतात. बसस्थानकाच्या आवारात पोलीस मदत केंद्र उभारले होते. मात्र तेथे पोलीस कर्मचारी असतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे.