Badlapur Crime : गोळीबाराचा बनाव करणे महागात पडले, आरोपींना बदलापूर पोलिसांना अटक, काय आहे प्रकरण?
दारु पित असताना किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र तपासात जे समोर आलं त्याने पोलिसांनाही धक्का बसला.
बदलापूर / 28 जुलै 2023 : चार दिवसांपूर्वी किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात तरुण जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने कळवा रुग्णालयात हलवण्यात आले होते. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बदलापूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असता, वेगळेच प्रकरण समोर आले. पीडिताने बदलापूरमध्ये गोळीबार झाल्याचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी हल्ला झालेल्या तरुणासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सदर गोळीबार तेलंगणात झाला होता, मात्र आरोपींनी बदलापूरमध्ये अज्ञातांनी गोळी झाडल्याचा बनाव केला होता.
काय आहे प्रकरण?
जखमी सुनील प्रजापती आणि त्याचा मित्र दोघेही तेलंगणातील नारायण पेठ येथे पिस्तुल हाताळत असताना गोळी सुटली. सुनील प्रजापती याच्या खांद्याला ही गोळी लागल्याने तो जखमी झाला. मात्र दुसऱ्या राज्यात कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून दोघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर बदलापूरमध्ये आले आणि पोलिसांना बदलापूरमध्ये आपल्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले.
बदलापूर पूर्व कात्रप परिसरात पनवेल हायवेजवळ दारु पित असताना आपला दोघा अज्ञातांसोबत किरकोळ वाद झाला. यावेळी दोन अज्ञातांनी आपल्यावर गोळी झाडल्याचा बनाव सुनील प्रजापतीने बदलापूर पोलिसांसमोर केला. याप्रकरणी पोलिसांनी जखमीच्या फिर्यादीवरुन दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. मात्र प्रत्यक्ष तपास करताना वेगळंच प्रकरण समोर आलं.
जखमी तरुणाने पोलिसांची फसवणू केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी जखमी तरुणासह त्याचा साथीदाराला अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तुल आणि काही जिवंत काडतूसं हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.