नवी मुंबई : कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावावर चाकू हल्ला केल्याची घटना नवी मुंबईतील सानपाडा येथे घडली. तेजस पाटील असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गंजलेला चाकून मानेत खुपसून भावाची हत्या करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मात्र या हल्ल्यानंतर पीडित स्वतः मानेत चाकू घेऊन एक किमी बाईक चालवत एमपीसीटी रुग्णालयात गेला. यानंतर रुग्णालयात सुमारे चार तास यशस्वी शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी चाकू बाहेर काढला. तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे. पीडिताच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तेजस पाटील हा व्यावसायिक आहे. तेजस पाटील आणि त्याचा भाऊ मोनिष यांचा पार्टनरशीपमध्ये टँकरचा व्यवसाय आहे. मात्र मोनिषला वाईट संगत लागल्याने तो व्यवसायात लक्ष देत नव्हता. मोनिषला दारुचे व्यसन आहे. यातून त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून मोनिषने आपल्या भावावर हल्ला केला. मात्र हा हल्ला नक्की याच कारणातून केला की अन्य काही कारण आहे? याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.
तेजसवर हल्ला झाला तेव्हा मोनिषचा मित्रही तेथे उपस्थित होता. तेजसची बायको आपल्या माहेरी उलवे येथे गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधत मोनिषने हा हल्ला केला. हल्ल्यानंतर तेजसने डगमगून न जाता थेट बाईक काढली आणि रुग्णालय गाठले. यानंतर रुग्णालया प्रशासनाने सानपाडा पोलिसांनी घटनेची माहिती दिली. तेजसला रुग्णालयात दाखल करत डॉक्टरांनी चार तास अथक प्रयत्न करत तेजसच्या मानेतील चाकू बाहेर काढला. तेजसची प्रकृती आता स्थिर आहे. पोलिसांनी तेजसच्या जबानीवरुन मोनिषविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.