मुंबई : फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार कोणते फंडे वापरतील सांगता येत नाही. झटपट अधिक पैसा कमावण्याचे माध्यम म्हणून अनेकांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो. लोकांच्या याच भावनांचा गैरफायदा घेत शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करणारे गुन्हेगार सोकावले आहेत. हे गुन्हेगार सरकारलाही गंडा घालायला सोडत नाहीत. अशीच एक घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून एका व्यक्तीने सरकारलाच तब्बल 1.95 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. जतीन सुरेश मेहता असे अटक आरोपीचे नाव आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेला कांदिवली पश्चिमेतील महावीर नगरमध्ये डब्बा ट्रेडिंग सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबई क्राईम ब्रँच युनिट 11 ने मंगळवारी महावीर नगरमधील संकेत बिल्डिंगमध्ये छापा टाकला. छापेमारीत पोलिसांनी मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि 50 रुपये रोकडसह आरोपीला अटक केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात आला.
मेहता हा 1993 पासून डब्बा ट्रेडिंग करत आहे. या डब्बा ट्रेडिंगमध्ये 4,672 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा संपूर्ण व्यवसाय हा क्रिकेटवरील सट्टेबाजीसारखा आहे, ज्यामध्ये सट्टेबाज मोबाईल फोनद्वारे पैसे लावत असत. यासाठी वापरण्यात येणारा पैसा लोकांकडून रोखीच्या माध्यमातून गुंतवला होता आणि कर चुकवण्यासाठी कोणताही व्यवहार झाला नाही. मेहता याने सरकारचे 1.95 कोटी रुपयांचे महसूल नुकसान केले आहे. नफा-तोटा मोजून मेहता लोकांकडून कमिशन घेत असे.
शेअर्सच्या ट्रेडिंगचे हे बेकायदेशीर मॉडेल आहे. यामध्ये, ट्रेडिंग रिंग ऑपरेटर स्टॉक एक्स्चेंज प्लॅटफॉर्मच्या बाहेर बेकायदेशीरपणे इक्विटी खरेदी करतात. फिक्स रिटर्नची लालच देऊन ते अॅप बनवतात. मग आयकर विभागाचे याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हवालाद्वारे पैशांचा व्यवहार करतात.