मुंबई / 28 जुलै 2023 : लग्नाच्या बहाण्याने महिलेशी जवळीक साधत तिची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका फायनान्स कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिलेला 12.50 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने कांजूमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत. सूर्या पर्वतनानी असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर मैत्री करत महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आरोपीने पीडितेशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. आपण जीवनसाथी अॅपवर कनेक्ट झालो होतो, परंतु आपले खाते हटवल्यामुळे संवादात व्यत्यय आला, असे सांगत त्याने महिलेशी मैत्री केली. मग दोघांनी आपले मोबाईल नंबर एक्स्चेंड केले. दोघांमध्ये फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल सुरु झाले. हळूहळू आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. मग तिला लग्नाची मागणी घातली.
महिला आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्याने आपल्याला तात्काळ पैशांची गरज असल्याचे सांगत महिलेकडे पैशांची मागणी केली. काही दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन देत महिलेकडे 12.50 लाक घेतले. पैसे मिळताच आरोपीने महिलेसोबत सर्व संपर्क तोडत गायब झाला. बराच प्रयत्न करुनही आरोपीशी संपर्क होत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर महिलेने कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.