यवतमाळ : प्रेयसी आपल्याला धोका देत असल्याची समज करत प्रियकरानेच तिची हत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जैन ले-आउट परिसरात सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आणि 24 तासाच्या आत प्रकरणचाा छडा लावला. या हत्येप्रकरणी तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे असे मयत तरुणीचे नाव आहे. तर विनोद रंगराव शितोळे असे आरोपीचे नाव असून, त्याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी वसमत येथून अटक केली आहे.
मृत प्रिया ही मूळची वरोरा येथील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती वणीतील जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेन्टमधील पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटचे मालक राकेश डुबे यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.
फ्लॅटच्या दरवाजा बाहेरून बंद होता. दार उघडून आत बघितले असता, प्रियाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत जमिनीवर पडून होता. तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. ही हत्या असल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरू केला. तपासात विनोद नामक तरुणाशी प्रियाचे प्रेमसंबंध होते आणि त्यानेच तिचा खून करून तो गावाकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम आरोपीच्या शोधार्थ निघाली. त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करीत आरोपी प्रियकर विनोद शितोळे याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गावातून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मृत प्रिया आणि विनोद या दोघांची मैत्री फेसबुकवरून झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो तिला भेटण्यासाठी नेहमीच वणीत येत असे. विनोद स्वभावाने संशयी होता. प्रियाचे अन्य कुणाशी प्रेमसंबंध असल्याची त्याला शंका होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात विनोदने प्रियाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.