कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. भररस्त्यात गुन्हेगारांकडून गुन्ह्याचं सत्र सुरु आहे. यावरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते. गुन्हेगार परिसरात आपली दहशत निर्माण करत आहेत, मात्र पोलीस कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगार सोकावले आहेत. कल्याणमधील काळा तलाव परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. परिसरात दहशत माजवण्यासाठी दोन तरुणांनी पिस्तुलने गोळीबार केल्याची घटना घडली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. गोळीबार केल्यानंतर परिसरातील गाड्यांची तोडफोड करत एका तरुणालाही मारहाण केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींचा काळा तलाव परिसरातील चंदन भदोरिया नावाच्या व्यक्तीशी जुना वाद होता. याच कारणातून आरोपी मध्यरात्री त्याला शोधण्यासाठी आले होते. यावेळी आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडित तरुणाला चंदनचा पत्ता विचारला. मात्र तरुणाने माहित नसल्याचे सांगितले. यानंतर आरोपींनी तरुणाला मारहाण केली.
परिसरातील गाड्यांची तोडफोड केली, गोळीबार केला. जवळपास अर्धा पाऊण तास आरोपींनी परिसरात धिंगाणा घातला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढीळ कार्यवाही करत आहेत. सतत घडणाऱ्या गोळीबार आणि तोडफोडीसारख्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावी अशी नागरिकांची मागणी आहे.