सीतामढी : सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियातही लग्न समारंभाच्या राजेशाही थाटाचे फोटो शेअर केले जात आहेत. एकापेक्षा एक सरस समारंभ केले जात असल्यामुळे प्रत्येक लग्नाची चर्चा होत आहे. बिहारच्या सीतामढी येथील लग्न समारंभ विशेष चर्चेत आला आहे. कारण मोठा थाटमाट करून लग्न बोहल्यावर चढण्यासाठी तयार झालेल्या वधू-वराला लग्न मंडपातच अर्ध्यावर डाव मोडावा लागला. रितीरिवाजानुसार एकमेकांभोवती दोन फेरे घेतले आणि अचानक वधूने लग्न करण्यास नकार दिला. तिच्या या नकाराने प्रचंड तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
वऱ्हाडी-ब्राह्मणांच्या साक्षीने मंडपात आलेले वधू-वर अखेर पोलीस ठाण्यात जाऊन लग्न होण्याआधीच एकमेकांपासून अलिप्त झाले. वधूने लग्नाला नकार देण्यामागील कारण ऐकून सर्वचजण चक्रावून गेले आहेत. लग्न मंडपात भटजी मंत्र म्हणत होते. वधू-वरांची सप्तपदी सुरु झाली. दोन फेरेही घेतले होते. किंबहुना वराच्या गळ्यात पुष्पहारही घातला होता. त्यानंतर अचानक वधूने मूड बदलला आणि सर्व लग्न सोहळ्याचा माहोल बिघडला. लग्न करणार नाही यावरच वधू ठाम राहिली. अचानक असा नकार का देतेस, असा प्रश्न वराने वधूला केला. त्यावर मला तू आवडत नाहीस, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही, असे अनपेक्षित उत्तर वराला ऐकावे लागले.
नवरदेव काळा असल्याने नवरीने लग्नाला नकार दिला. सीतामढी येथील सोनवर्षा परिसरात झालेल्या लग्नात हा सर्व गोंधळ निर्माण झाला. वधूच्या घरच्या मंडळींनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्न न करण्यावर ठाम राहिलेल्या वधूने कुणाचेही ऐकले नाही. त्यामुळे वर पक्षासह नातेवाईक आणि सर्व वऱ्हाडी मंडळींना लग्न न होताच घरी परतावे लागले.
वधूच्या कृत्यामुळे वऱ्हाडी मंडळीही नाराज झाली. त्यामुळे वधूच्या बाजूने आलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी भेट म्हणून दिलेले पैसे आणि वस्तू परत मागण्यास सुरुवात केली. 17 मे रोजी ही घटना घडली. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्या अनुषंगाने दोन्ही बाजूकडील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आणि पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आले. दरम्यान, वधूचे दुसऱ्या तरुणाशी अफेअर असावे म्हणून तिने लग्न मोडल्याचा आरोप वराच्या कुटुंबीयांनी केला आहे.