मदत करण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात
एटीएममध्ये जेष्ठ नागरिकांना गंडा घालून पैसे घेऊन पसार व्हायचे. अनेक दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र पोलिसांपुढे फार काही चालले नाही.
मुंबई : एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना गंडा घालून त्यांचे पैसे लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. कुरार पोलिसांनी भांडुप येथून महतो टोळीच्या चार जणांना अटक केली आहे. धरमवीर किशून महातो, विवेककुमार बुधन पासवान, बिरलाल लक्ष्मण साह आणि किशोर कांचन महातो अशी सर्व आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 11 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे गंडा घातला आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
सीसीटीव्ही, तांत्रिक तपासाच्या आधारे टोळी जेरबंद
एटीएममध्ये जेष्ठ नागरिकांना गंडा घालण्याच्या घटना वाढत होत्या. मुंबईतील विविध ठिकाणी ही टोळी जेष्ठ नागरिकांना गंडा घालून पैसे घेऊन फरार होत होती. मालाड परिसरातही टोळीने अशा प्रकारे फसवणूक केली होती. याप्रकरणी कुरार पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 109 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भांडुप येथे छापेमारी करत चार आरोपींना अटक केली आहे. ही टोळी मूळची बिहारची असून, लुटीसाठी मुंबईत यायची. मुंबई येऊन लोकांना गंडा घालायचे, पैसे लुटायचे आणि बिहारला निघून जायचे.